Tue, Jun 25, 2019 21:29होमपेज › Kolhapur › थेट पाईपलाईन ठेकेदारांना आयुक्तांनी झापले

थेट पाईपलाईन ठेकेदारांना आयुक्तांनी झापले

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 07 2018 12:23AM

बुकमार्क करा
कोल्हापूर ः प्रतिनिधी 

जी.के.सी. कंपनीकडून थेट पाईपलाईन योजनेंतर्गत क्रांतिसिंह नाना पाटीलनगर-जीवबा नाना पार्क परिसरात टाकण्यात आलेल्या पाईपलाईनची पाहणी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी शनिवारी केली. पाईपलाईन खोदाईमुळे खराब झालेले रस्ते पूर्ववत करण्याबाबत जलअभियंता सुरेश कुलकर्णी व जी.के.सी. कंपनीच्या प्रतिनिधींना आयुक्तांनी सक्त सूचना दिल्या. तसेच त्यावरून जी.के.सी. प्रतिनिधींचीही चांगलीच कानउघाडणी केली. 

फुलेवाडी रिंगरोड गंगाई लॉन ते पी. एन. पाटील गॅरेज या रस्त्यावर थेट पाईपलाईन योेजनेतून टाकण्यात आलेल्या पाईपलाईन मार्गाची पाहणी केली. ठेकेदार व जी.के.सी. यांच्याकडून पाईपलाईन टाकलेल्या रस्त्याचे डांबरीकरण केल्याचे निदर्शनास आले. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथील डांबरी रस्त्याच्या मध्यभागी रस्ता दुभाजकासाठी खुली चाच मुजवून डांबरीकरण करण्याच्या सूचना उपशहर अभियंता एस. के. माने यांना केल्या. 

कनेरकरनगर-क्रांतिसिंह नाना पाटीलनगर प्रभागातील नगरोत्थान रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला. स्टॉर्म वॉटर ड्रेन चेंबर्सवरील झाकणे तातडीने बसविण्याबाबत सूचना देण्यात आल्या. लक्ष्मीबाई साळोखे कॉलनी रिंगरोड नगरोत्थान रस्त्यावरील गळतीमुळे निर्माण झालेले खड्डे तातडीने 24 तासांत मुरूम टाकून पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या. चिवा बाजार येथील पाणीपुरवठा मेन व्हॉल्व्हमधील गळतीमुळे, तसेच थेट पाईपलाईन व इतर योजनांतर्गत टाकण्यात आलेल्या पाईपलाईनमधील गळतीने खराब झालेल्या रस्त्याची पाहणी केली. या रस्त्यावरील गळती व तत्सम कामे तातडीने पूर्ण करून रस्ता डांबरी करण्यासाठी पाणीपुरवठा अधिकार्‍यांना सूचना दिल्या. तसेच नगरोत्थान योजनेतून या रस्त्याचे काम करण्याचे आदेश दिले. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता कुलकर्णी, उपशहर अभियंता माने, कनिष्ठ अभियंता अनिरुद्ध कोरडे, जी.के.सी. कंपनी व व्ही.यू.बी. ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.