Thu, Apr 25, 2019 15:28होमपेज › Kolhapur › धनगर समाजातर्फे उद्या आरक्षण जागृती रॅली

धनगर समाजातर्फे उद्या आरक्षण जागृती रॅली

Published On: Feb 03 2018 2:21AM | Last Updated: Feb 03 2018 1:29AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

धनगर समाजातर्फे रविवारी कोल्हापुरात आरक्षण जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. 4) दुपारी 1 वाजता गांधी मैदानातून रॅलीला सुरुवात होणार आहे. रॅली गांधी मैदान, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौक, आईसाहेब महाराज पुतळा मार्गे दसरा चौकात येणार असल्याचे धनगर समाज क्रांतिकारी संघातर्फे प्रसिद्धी-पत्रकाद्वारे कळविण्यात आले. जनजागृती रॅलीला गांधी मैदानातून सुरुवात होणार आहे. तालुकानिहाय पारंपरिक धनगरी ओव्या, गजनृत्य, डंगे गजनृत्य यांचा सहभाग रॅलीमध्ये असणार आहे. रॅली गांधीमैदान, महाद्वार रोड, पापाची तिकटी, माळकर तिकटी, आईसाहेब महाराज पुतळामार्गे दसरा चौकात येणार आहे. याठिकाणी मंडपात मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. 

रॅली शांतता व सुव्यवस्थेत पार पडावी यासाठी धनगर समाज क्रांतिकारी संघातर्फे स्वयंसेवकांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. हे स्वयंसेवक रॅली मार्गावर जागोजागी थांबणार आहेत. तसेच रॅली मार्गाची सफाई, देखरेख, पोलिसांना सहकार्य अशा जबाबदारी त्यांच्यावर असणार आहेत असे समितीतर्फे सांगण्यात आले. दरम्यान, रॅलीच्या पार्श्‍वभूमीवर शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी पोलिस अधिकारी आणि धनगर समाजाच्या प्रमुख नेते, पदाधिकारी यांची बैठक शुक्रवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात घेतली. रॅलीमार्ग, पोलिस बंदोबस्त, पार्किंग सुविधा याविषयी सविस्तर चर्चा या बैठकीत झाली. 

पार्किंगची व्यवस्था

1. राधानगरी, गडहिंग्लज, आजरा तालुक्यांतून येणारी वाहने इराणी खण, क्रशर चौकात थांबतील.

2. कागल, हातकणंगले, शिरोळ, इचलकरंजीकडून येणारी वाहने आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूल पटांगणावर येतील. 

3. शाहूवाडी, पन्हाळा, कसबा बावडा, तावडे हॉटेल मार्गे येणारी वाहने कनाननगरातील रिकाम्या मैदानावर पार्क करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.