कोल्हापूर : प्रतिनिधी
वर्षोनुवर्षे डोंगर-कपारीत राहून जीवनमान जगणार्या धनगर समाजाच्या उन्नतीसाठी मंडल आयोगाने या समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश केला आहे, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. शासनाने येत्या उन्हाळी अधिवेशनात त्याची अंमलबजावणी करावी, (अर्थसंकल्पीय); अन्यथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दारात बिरोबाचे मंदिर उभा करून तेथे धनगरी ढोल बडवण्याचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा धनगर समाज क्रांतीकारी संघाचे अध्यक्ष विलास वाघमोडे यांनी मेळाव्यात बोलताना दिली.
धनगर समाज क्रांतीकारी संघाच्या वतीने धनगर समाजाचा आरक्षण मेळावा आणि शासनाचा निषेध करण्यासाठी मोर्चा 7 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. मुस्लिम बोर्डिंगमध्ये हा मेळावा झाला. अध्यक्षस्थानी गणी आजगेकर होते. वाघमोडे यांनी धनगर समाजातील नेत्यांचा चांगला परामर्ष घेतला. समाजाच्या उन्नतीसाठी व समाजातील मूले शिकली पाहिजेत, यासाठी क्रांतीकार संघाच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत, त्यातील पहिला उपक्रम म्हणजे समाजातील मुलांनासाठी वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. याच वसतिगृहात स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशा पुस्तकांचे ग्रंथालय सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.
प्रवीण काकडे (कराड) यांनी मनोगत व्यक्त केले. कुंभार समाजाचे मारुतराव कातवरे यांनी धनगर समाजाच्या मोर्चाला पाठिंबा व्यक्त केला. स्वागत संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. राजेंद्र कोळेकर यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष कृष्णात शेळके यांनी केले. यावेळी बापूराव बोडगे, प्रा. लक्ष्मण करपे यांची भाषणे झाली. यावेळी उमेश पोर्लेकर, उन्मेश वाघमारे, धोंडिराम सिद, शिवाजी कदम, तानाजी मर्दाने, दीपक शेळके, विजय गोरड, सारंग येडगे, राहुल कात्रट आदी उपस्थित होते.