Fri, Apr 26, 2019 17:19होमपेज › Kolhapur › दिल्लीत कोल्हापूरची ओळख निर्माण केली : खा. महाडिक

दिल्लीत कोल्हापूरची ओळख निर्माण केली : खा. महाडिक

Published On: Jan 15 2018 1:48AM | Last Updated: Jan 15 2018 1:39AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

2014 ची लोकसभा निवडणूक देशाला वेगळी दिशा देणारी होती. सर्वत्र एक लाट होती. त्या लाटेतही कोल्हापूर मतदारसंघातून विजयी झालेल्या खासदार धनंजय महाडिक यांनी तीन वर्षांत आपल्या कामातून जनतेचा विश्‍वास सार्थ ठरवला. उत्कृष्ट संसदपटू, संसदरत्न पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला. दिल्लीत कोल्हापूरची वेगळी ओळख निर्माण झाली. ही ओळख अधिक दृढ करण्याची संधी आहे, तशी क्षमताही आहे, त्याला जनतेने साथ द्यावी, अशा भावना खासदार धनंजय महाडिक यांनी वाढदिवसानिमित्त घेतलेल्या मुलाखतीत व्यक्त केल्या.

खासदार म्हणून तीन वर्षे झाली, या कारकिर्दीबद्दल काय सांगाल असे विचारता, खा. महाडिक म्हणाले, 2014 ची लोकसभा निवडणूक सोपी नव्हती. संपूर्ण देशात वेगळी लाट होती. त्यातही जनतेने मला निवडून दिले. यामुळे पहिल्या दिवसापासून केवळ जनतेसाठी काम करत गेलो. निधी दिला म्हणजे खासदारांचे काम झाले, असेच चित्र आपण पाहत होतो. मात्र, खासदार केवळ निधीपुरता नाही. तो संसदेत जातो, ते कायदेमंडळ आहे, त्यात सहभागी झाले पाहिजे, त्याकरिता अभ्यास सुरू केला.

किती प्रश्‍न मांडू शकतो, कोणत्या चर्चेत सहभागी होऊ शकतो, या सर्वांचा अभ्यास केला. माझा पहिला प्रश्‍न आला तेव्हा, उत्सुकता तर होतीच; पण थोडे दडपणही होते. रात्रभर तयारी करत होतो. जनतेसाठी सर्व काही करायचे आहे, याची जाणीव असल्याने पोटतिडकीने प्रश्‍न मांडला आणि त्यानंतर मागे कधीच पाहिले नाही. तीन वर्षांत 800 हून अधिक प्रश्‍न सभागृहात मांडले. संसदेत सर्वात जास्त प्रश्‍न विचारणारा, चर्चेत सहभागी होणारा, बिलावर बोलणारा खासदार अशी ओळख झाली. त्यातून उत्कृष्ट संसदपटू आणि संसदरत्न पुरस्कारही मिळाला. लोकांच्या प्रश्‍नांसाठी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर काम करत गेलो, त्याचे आत्मिक समाधान आहे.

काम करणारा खासदार अशी आपली ओळख निर्माण झाली आहे, याबाबत विचारता, खा. महाडिक म्हणाले, पहिल्या दिवसापासून केवळ लोकांसाठीच काम हाच आपण अजेंडा ठरवला आणि काम करत गेलो. कोल्हापूर आणि दिल्ली, याचा मेळ घातला. दर महिन्याला चार ते पाच हजार किलोमीटर प्रवास, करत जनतेने जे काम दिले आहे, ते करत आहे. धावपळ होतेे; पण वय आहे, तशी क्षमता आणि विकासाचा ध्यास आहे. या तिन्ही बाबी जुळून आल्या, त्यातून काम सुरू आहे. 

जिल्ह्यासाठी भरीव निधी आला, अनेक प्रश्‍नांना गती आली, याबाबत विचारता खा. महाडिक म्हणाले, खासदारांना निधी आणण्यात फार कौशल्य लागत नाही. दरवर्षी मतदारसंघासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध होतोच; पण अनेकदा या निधीचाही नीट विनियोग होत नाही. माझा तीन वर्षांतील निधी खर्च झाला आहे, पुढच्या कामांच्या प्रशासकीय मंजुर्‍याही झाल्या आहेत. खासदार निधी आहेच; पण दिल्लीतून काय आणले, हे महत्त्वाचे आहे.

खासदार झालो तर दिल्लीतून हजार कोटींचा निधी आणू, असे मी प्रचारात सांगत होतो; पण त्यापेक्षा कितीतरी अधिक निधी केवळ तीन वर्षांत आणला. कोल्हापूर-वैभववाडी हा मार्ग मंजूर करून घेतला. त्यासाठी 3,500 कोटींची तरतूद झाली. 1,700 कोटी खात्यावर वर्गही झाले. मार्च महिन्यापर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. कोल्हापूर स्थानकासाठीही 19 कोटी रुपयांचा निधी  आणला.

पादचारी पुलाचाही प्रश्‍नही सोडवला. पंचगंगा नदीवर 170 कोटी रुपयांचा ‘बास्केट ब्रिज’ मंजूर करून आणला, त्याचे 120 कोटी रुपये वर्ग झाले आहेत, या ब्रिजमुळे कोल्हापूरची वेगळी ओळख निर्माण होणार आहे. सीआरएफ, नाबार्डचा निधी यातून जिल्ह्यात 300 कोटी रुपयांची रस्ते आणि पुलांची कामे मंजूर झाली आहेत. विमानतळ विस्तारीकरणासाठी 274 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. गेल्यावर्षी बीएसएनएलचे 23 टॉवर मंजूर करून आणले होते. यावर्षी 128 आणखी टॉवर मंजूर करून आणले आहेत. यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात ‘रेंज’ येणार आहे. दिल्लीतून विविध प्रकारे निधी आणता येतो, हे मी दाखवून दिले आहे. 

पासपोर्ट कार्यालयासाठी मी वारंवार सुषमा स्वराज्य यांच्या कार्यालयात जात होतो, दरवाजा उघडला की, स्वराज्य म्हणायच्या, ‘आपका काम मै करूँगी,’ अधिकार्‍यांना म्हणायच्या, ‘ये बच्चा हमेशा यहाँ आता है, इसका काम सबसे पहिले कर दो.’ त्यातून देशातील पहिले पोस्टातील पासपोर्ट कार्यालय कोल्हापुरात झाले आणि ते सर्वात आघाडीवरही आहे. शिवाजी पुलाचा प्रश्‍न गंभीर बनला; पण त्यासाठी कायदा बदलला गेला, ही एक ऐतिहासिक घटनाच म्हणावी लागेल, याबाबत विचारता  खा. महाडिक म्हणाले, केवळ लोकांसाठी काम करायचे, या एकमेव हेतूने इच्छाशक्ती आणि पाठपुरावा या दोन्हीच्या जोरावर ही ऐतिहासिक घटना घडली.

पुरातत्त्व विभागाच्या कायद्यात बदल करणे शक्य नव्हते. मात्र, महाडच्या दुर्घटनेनंतर शिवाजी पुलाचा प्रश्‍न अभ्यासपूर्ण मांडला. योग्य पाठपुरावा केला. त्यामुळे या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक लोकसभेत आले. त्याला विरोधी पक्षाने विरोध केला. मात्र, हे विधेयक किती महत्त्वाचे आहे, हे संबंधित खात्याचे मंत्री आनंद शर्मा यांनी संसदेत तपशीलवार सांगितले.  या विधेयकासाठी पाठपुरावा करून ते संसदेत आणण्यास भाग पाडल्याबद्दल शर्मा यांनी आपल्या भाषणात माझा गौरव केला.

आता हे विधेयक राज्यसभेत मंजूर होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. आपण राष्ट्रवादी काँगे्रसचे खासदार आहोत, जिल्ह्यात पक्षीय पातळीवर अनेक घडामोडी होत आहेत, त्यात आपला सक्रिय सहभाग कमी असतो, याबाबत विचारता खा. महाडिक म्हणाले, हे खरे आहे; पण लोकांनी ज्या उद्देशाने निवडून दिले आहे, तो उद्देश सफल करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक व्हावी, निधी  आणावा, त्यातून जिल्ह्याचा विकास कसा होईल, याकडे अधिक लक्ष आहे.

आपली पश्‍चिम बंगालमध्ये होर्डिंग्ज लागली याबद्दल काय सांगाल असे विचारता खा. महाडिक म्हणाले, संसद ही देशाची सर्वोच्च संस्था आहे, त्या ठिकाणी देशाची ध्येय-धोरणे निश्‍चित होतात. तिथे विविध विषयांवरील प्रश्‍न मांडले, चर्चेत सहभागी झालो. जीएसटीबाबत वेगवेगळ्या संघटनांची पाच शिष्टमंडळांसमवेत अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. सिमेंटवरील जीएसटी कमी झाला, वस्त्रोद्योगाला जीएसटीत सवलत मिळाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गणेशमूर्तींसाठी जो जीएसटी लावला होता, तो पूर्णपणे रद्द केला. त्याचा फायदा दुर्गामातांच्या मूर्तिकारांनाही झाला. त्यांनी पश्‍चिम बंगालमध्ये अभिनंदनाचे होर्डिंग्ज लावले इस्रायलच्या राजदूतांनी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी येऊन खास अभिनंदन केले. 

नार्वेच्या राजदूतांनीही भेट घेतली. नार्वे जगातील आता सर्वात श्रीमंत देश ठरला आहे, तो केवळ मासा निर्यातीमुळे. त्यांचे मासे घेऊन येणारे कंटनेर भारतात विमानतळावर चार ते पाच दिवस अडकून पडतात. त्याबाबत पाठपुरावा करण्याची विनंती त्यांनी केली, त्याला यश आले आणि तो कालावधी आता तीन दिवसांचा झाला आहे. तुमच्या कामामुळे दिल्लीत तुमची ओळख निर्माण झाली असेल, याबाबत विचारता खा. महाडिक म्हणाले,  तुमच्या घरातील कोणी खासदार होते म्हणून तुम्ही होणार हा काळ आता निघून गेला आहे.

तुम्ही काम करून, त्याच्या जोरावर कसे उभे राहता, हे महत्त्वाचे आहे. दिल्लीत उत्तर भारतीयांचे महत्त्व अधिक आहे. केंद्राचे राजकारण त्यांच्या भोवतीच फिरत असते. अशा परिस्थितीत आजवर केलेल्या कामाने प्रत्येक खासदार ओळखत आहे,  मंत्री, मंत्रालयातील अधिकार्‍यांशी चांगले संबंध निर्माण झाले आहेत. यामुळे दिल्लीत कोल्हापूरची ओळख निर्माण झाली आहे. ही ओळख अधिक दृढ करण्याची संधी आहे, तशी क्षमताही आहे. त्याकरिता लोकांनी साथ दिली पाहिजे.