Sat, Aug 17, 2019 16:46होमपेज › Kolhapur › दारू दुकानांवरील देव देवतांची नावे हटवा

दारू दुकानांवरील देव देवतांची नावे हटवा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : डी. बी. चव्हाण

दारू दुकान, बीअर बारला देव-देवता, महापुरुषांची नावे द्यावयाची नाहीत, असा शासनाने कायदा केला आहे. तरीही जोतिबा, कृष्णा, साई, साईदर्शन यासह स्थानिक देवतांची नावे दिलेली जिल्ह्यात सुमारे 50 हून अधिक दारूची दुकाने आहेत. या दुकानांवरील हे फलक काढून घेण्यास लावण्याबाबत उत्पादन शुल्क विभागाला शासनाने सूचना केल्या आहेत. पण, अधिकार्‍यांचा नाकर्तेपणा आणि खात्यातील वरिष्ठांचे दुर्लक्ष, यामुळे दारू दुकानांवरील देव-देवता, महापुरुषांच्या नावांचे  झळकतच आहेत. 

देवाच्या नावाने दारूचे दुकान सुरू केल्याने भरभराट होईल, असे कोणीतरी सांगते. त्यामुळे काही दारू दुकानदार परवाना घेताना अमुक एका देवाचे नाव दुकानास मिळावे, यासाठी आटापिटा करत असतात. खात्यातील काही मंडळी ‘त्याला’ भाळून सर्व नियम धाब्यावर बसवत, हव्या त्या नावावर मंजुरी दिली जाते. एका गावात एका पठ्ठ्याने चक्क म्हसोबा बार या नावाने दारूचे दुकान सुरू केले आहे. जिल्ह्यातील अनेक गावांत अशी देव-देवता, महापुरुषांच्या नावांवर दारूची दुकाने सुरू आहे.

खरं तर, देवदेवता व महापुरुषांच्या नावांवर दारूची दुकाने सुरू होऊ नये यासाठी कायदा आहे, हे माहीत असतानाही ते देण्याचे कर्म खात्यातील अधिकार्‍यांकडून होत आहे. यासंदर्भात अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता तशा नावांच्या दुकानांना पूर्वीच्या साहेबांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता बदल करणे कठीण जात आहे, तरीही ते फलक उतरण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगून खात्यातील अधिकारी याबाबत माहिती देण्यासही टाळाटाळ करत आहेत. देवाच्या नावाने दारूच्या दुकानांवर फलक लावल्याने भावना दुखावण्याचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे खात्याने याची गांभीर्याने दखल घेऊन दारू दुकानांवरील आक्षेपार्ह फलक काढण्याची गरज आहे; पण हे धाडस कोणी दाखवावयाचे, असा प्रश्‍न आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात देव-देवतांच्या नावांचे फलक असलेली दारूची दुकाने किती आहेत, याची निश्‍चित आकडेवारी जिल्हा उत्पादन शुल्क विभागाकडे उपलब्ध नसल्याचे एका अधिकार्‍यांनी सांगितले; पण शहरासह जिल्ह्यात 50 पर्यंत दारूच्या दुकानांवर देव-देवतांच्या व महापुरुषांच्या नावांचे फलक असावेत, असे सांगितले. कोल्हापूर शहरात देव-देवतांची नावे असलेली दारूची 8 ते 10 दुकाने आहेत, संबंधित विक्रेत्यांना हे फलक काढून घेण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत, असे उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापूर शहर निरीक्षक संजय जाधव यांनी सांगितले.