Mon, Nov 19, 2018 14:45होमपेज › Kolhapur › सात-बारा कोरा करा

सात-बारा कोरा करा

Published On: Dec 06 2017 2:01AM | Last Updated: Dec 05 2017 11:53PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सात-बारा कोरा करा, शेतीमाल खरेदी केंद्राची व्यवस्था बदलून प्रत्येक आठवडा बाजारनिहाय खरेदी केंद्रे सुरू करा, या मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. टेंबे रोडवरील शेकापच्या कार्यालयापासून या मोर्चाला प्रारंभ झाला. तेथून बिंदू चौक, महापालिका, सीपीआर चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. शेतकर्‍यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, कर्जमाफी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, अशा घोषणा देत मोठ्या संख्येने महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर सभा झाली. 

यावेळी संपतराव पवार-पाटील म्हणाले, कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांनी केलेल्या संपानंतर राज्य शासनाने दीड लाखापर्यंत प्रत्येक शेतकर्‍याची कर्जमाफी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. ही घोषणा होऊन सहा महिने उटले आहेत; पण एक रुपयाही शेतकर्‍यांच्या बँक खात्यांवर जमा झालेला नाही. यामुळे ही कर्जमाफी तर शेतकर्‍यांची फसवणूक ठरत आहे. शेतीमाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळण्यासाठी  स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावयाचे आश्‍वासन दिले होते; परंतु केंद्राची व राज्याची सत्ता ताब्यात असूनही निव्वळ घोषणांच्या पलीकडे आजअखेर काहीही झालेले नाही. यामुळेच गेल्या तीन वर्षांत शेतकर्‍यांच्या आत्महत्या काही थांबलेल्या नाहीत. मोर्चात वसंत कांबळे, संतराम पाटील, सुभाष झेंडे, गोपाळ पाटील, महिला आघाडीच्या अ‍ॅड. उज्ज्वला कदम यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या.