Sun, Nov 18, 2018 01:00होमपेज › Kolhapur › कर्जमाफीत ३०हजार शेतकरी होणार अपात्र

कर्जमाफीत ३०हजार शेतकरी होणार अपात्र

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : सदानंद पाटील

शासनाने जाहीर केलेल्या कृषी कर्जमाफीत जिल्ह्यातील थकीत कर्ज असलेल्या सुमारे 30,500 शेतकर्‍यांना कर्जमाफी न मिळण्याचे संके त मिळत आहेत. 2009 पूर्वीच्या कर्जदारांना कर्जमाफी न देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. वरील थकबाकीदारांनी 2009 पूर्वी कर्ज घेतले आहे. या कर्जदारांनी कर्जमाफीचे फॉर्म भरून माहिती सादर केली आहे. मात्र, निकषांचा फटका या शेतकर्‍यांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्हा बँकेच्या अधिकार्‍यांनी मात्र या विषयावर मौन पाळले आहे.

शासनाने कर्जमाफीची घोषणा करताना अटी व निकष घातले आहेत. त्यानुसार 2009 पूर्वी ज्या शेतकर्‍यांनी कर्ज घेतले आहे; पण ते फेडलेले नाही अशा थकबाकीदारांना कर्जमाफी न देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात दीड लाखापर्यंत 53,262 कर्जदार असून, त्यांची थकबाकी 223 कोटी 17 लाख इतकी आहे. तर दीड लाखावरील थकबाकीदारांची संख्या 3,325 इतकी असून, त्यांची थकबाकी 86 कोटी 74 लाख इतकी आहे. एकूण 56 हजार 587 थकबाकीदारांकडे 309 कोटी 91 लाखांची थकबाकी आहे. या सर्व थकबाकीदारांनी कर्जमाफीसाठी आपले ऑनलाईन अर्ज सादर केले असून, कर्जमाफीची सर्व माहिती सादर केली आहे. 

थकबाकीदारांची माहिती सादर करताना त्यांच्या कर्जाचा कालावधी नियमाप्रमाणे घेण्याच्या सूचना सहकार खात्याने दिल्या होत्या. निकषांप्रमाणे 2009 पूर्वीच्या कर्ज खात्यांची माहिती सादरच करू नये, अशा सूचना होत्या. तरीही बँकेसह सेवा संस्थांनी 2009 पूर्वीच्या थकबाकीदारांची माहिती सादर केली आहे. ऑनलाईन पडताळणीत आता ही माहिती उघड होत आहे. शासनाचे निकष डावलून जी माहिती सादर करण्यात आली आहे, त्यास कोणाला जबाबदार धरायचे, याची चर्चा आता सहकार खात्यात सुरू आहे.
सुमारे 100 कोटींची रक्कम

शासनाच्या निकषांनुसार एकूण थकबाकीदारांपैकी 2009 पूर्वीचे सुमारे 30 हजार थकबाकीदार अपात्र होणार असल्याने त्यांच्या अपात्र रकमेचा आकडाही मोठा असणार आहे. या रकमेचा अंदाज घेणे सुरू असून, किमान 100 कोटींच्या जवळपास ही रक्कम जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.