Thu, Jul 18, 2019 06:41होमपेज › Kolhapur › पर्यटनस्थळे, मंदिरांमध्ये गर्दीचा उच्चांक

पर्यटनस्थळे, मंदिरांमध्ये गर्दीचा उच्चांक

Published On: Dec 25 2017 1:32AM | Last Updated: Dec 25 2017 1:30AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : ठीकठिकाणांच्या प्रतिनिधींकडून 

सलग सुट्ट्या आणि गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले असून, राज्यातील बहुतांश पर्यटनस्थळे तसेच प्रमुख मंदिरांत रविवारी गर्दीने उच्चांक गाठला होता. गोवा, सिंधुदुर्ग येथील समुद्रकिनारे पर्याटकांनी फुलले असून तुळजापूर, शिर्डी, पंढपुरात दर्शनासाठी भल्या मोठ्या रांगा लागल्या. मुंबई-पुण्यातून कोकण, गोव्यात निघालेल्या अनेकांना रविवारीदेखील वाहतूक कोंडीचा फटकाही बसला. 

शिर्डीत साईभक्तांचा जनसागर

शनिवारी रात्री व रविवारी पहाटेपासून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत  देशभरातून साईभक्तांचा जनसागर उसळला आहे. दरम्यान, भाविकांच्या गर्दीच्या नियोजनासाठी प्रशासनाची मोठी धांदल  डाल्याचे पाहायला मिळाले. दर्शनबारीचा प्रवेशद्वार क्रमांक 2 बंद करण्यात आले होते. जुन्या प्रसादालयाच्या जागेत मोफत दर्शन तिकिटाचे काऊंटर उघडण्यात आले होते. तसेच लक्ष्मी मार्गावर असणारे मोफत दर्शन तिकिटाचे कांऊटरही सुरूच होते. या ठिकाणावरून त्यांना प्रवेशद्वार क्रमांक 2 चे दर्शन तिकीट मिळत होते; मात्र दोन नंबर गेट बंद असल्याने भाविकांची त्रेधातिरपीट उडाली होती. त्यामुळे मोफत पास घेण्यासाठी व त्यानंतर दर्शन रांगेतही ताटकळत उभे राहावे लागत असल्याने दर्शन मिळेल की नाही, अशी चिंता भाविक बोलून दाखवत होते. रविवारीच सकाळी मंदिर परिसरात प्रवेशद्वार क्रमांक 1 हा विनावाहन ठिकाण म्हणून घोषित करून कारवाई सुरू केली. त्यामुळे शिर्डीत येणार्‍या भाविकांना रिंगरोडवरून जावे लागले. त्यामुळे भाविकांना या त्रासापासून सुटका मिळाली, तर प्रसादालयाकडे जाणार्‍या-येणार्‍या वाहनांसाठी प्रवेश निषिद्ध करण्यात आला होता.

पर्यटकांची सिंधुदुर्गला पसंती

पर्यटकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, वेंगुर्लेसह किनारपट्टीला सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हॉटेल बुकिंग 5 जानेवारीपर्यंत हाऊसफुल्ल झाली आहेत. किनारपट्टीवरील सर्वांत सुरक्षित बीच म्हणून ‘चिवला बीच’ ओळखला जातो. या ठिकाणी वॉटर स्पोर्टस्, पॅरासेलिंग बोटिंग व स्कूबा डायव्हिंग पर्यटकांना उपलब्ध करून दिली आहे. किल्ला सिंधुदुर्गच्या अगदी समोर साकारलेले दांडी बीच, सी वर्ल्ड पार्क पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.

महाबळेश्‍वर-पाचगणीही फुल्ल 

महाबळेश्‍वर व पाचगणी ही   पर्यटनस्थळे बहरली आहेत. सलग तीन दिवस सुट्टी असल्याने शनिवारपासूनच या परिसरात पर्यटक तळ ठोकून आहेत. या पर्यटनस्थळांवरील विविध पॉईंट व अन्य प्रेक्षणीय ठिकाणी गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे दोन्ही शहरांमध्ये वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. पर्यटकांचे फेवरिट डेस्टिनेशन असणार्‍या वेण्णा लेक, लिंगमळा, टेबल लँड आणि सिडनी पॉईंट परिसरात गर्दी वाढू लागली आहे. 

गोव्यात धामधूम

गोव्यात नाताळ व नववर्षाच्या स्वागताची धामधूम सुरू झाली आहे. सलग सुट्यांमुळे तसेच नाताळ सणासाठी बाजारात खरेदीची झुंबड उडाल्याचे दिसून आले. गेल्या चार पाच दिवसांपासून किनारी भागात, तसेच इतर पर्यटनस्थळांवर पर्यटक भेटी देऊ लागले आहेत. रविवारी गर्दीने किनारे फुलून गेल्याचे दिसून आले. स्थानिकांसह पर्यटकांनीही नाताळ व त्यानंतर येणार्‍या नववर्षाचे स्वागत करण्यास आपल्या पसंतीची हॉटेल्स व ओपन पार्टी हॉल्सचे बुकिंग करून ठेवले आहे. देशी व विदेशी पर्यटकांनी समुद्रकिनार्‍यांवरील हॉटेल्सचे 2-3 महिने  आधीच ऑनलाईन बुकिंग करून ठेवले 
होते.