Thu, Nov 15, 2018 03:09होमपेज › Kolhapur › दर घसरणीने ‘अर्थ’कारण बिघडले!

दर घसरणीने ‘अर्थ’कारण बिघडले!

Published On: Dec 25 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 12:38AM

बुकमार्क करा

कोल्हापूर ः प्रतिनिधी

गायीच्या दूध दरातील घसरणीमुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. अनेक तरुणांनी कर्ज काढून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायात सध्या ‘ना नफा, ना तोटा’ असे चित्र असून, येणारा पैसा गोठ्यातील गायींना सांभाळण्यासाठी  खर्च होत आहे. बँकेचे हप्ते कसे फेडायचे? घर कसे चालवायचे? असा प्रश्‍न दूध उत्पादकांसमोर आहे. जिल्ह्यात हजारहून अधिक मोठ्या गोठ्यांची संख्या आहे. या व्यवसायात काही पारंपरिक शेतकरीही आहेत; पण नव्याने व्यवसाय सुरू केलेल्या तरुणांची आर्थिक कोंडी झाली आहे. 

पाण्याची आणि चार्‍याची सोय असणार्‍या गावांमध्ये 20 ते 50 आणि त्याहून अधिक गायी असणार्‍या गोठ्यांची संख्या मोठी आहे. गोठ्यात जेवढ्या गायी असतात, त्या सर्वच दुभत्या नसतात. त्यापैकी काही वयाने लहान, काही गाभण, तर काही गायींचे दूध देण्याचे प्रमाण कमी झालेले असते. गायीने दूध दिले अथवा नाही दिले, तरी त्यांना खाद्य वेळच्या वेळी आणि ठरलेल्या प्रमाणात द्यावेच लागते. अशा परिस्थितीत जर दुधाचे दर घसरत राहिले, तर व्यवसाय करायचा कसा, असे मोठे संकट दूध उत्पादकांसमोर ठाकले आहे. काही तरुणांनी व्यवसाय नव्हे, तर उद्योग म्हणून गायी पालन सुरू केले. त्यांच्यावर आज बेरोजगारी परवडली म्हणण्याची वेळ आली आहे.

सहकारी आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्जे घेऊन अनेक तरुणांनी गायींचे गोठे सुरू केले. प्रतिलिटर 27 रुपये दर असताना हा व्यवसाय फायद्यात होता. आता मात्र दरात घट झाल्याने पश्‍चात्ताप करण्याची वेळ आल्याचे या व्यवसायातील तरुणांनी सांगितले. गेल्या दोन महिन्यांपासून बँकांचे हप्ते वेळेवर जात नसल्याची परिस्थिती आहे. गायींच्या आरोग्यापासून खाद्यापर्यंत मोठा खर्च असताना दुधाला दर मिळाला नाही, तर हा व्यवसाय आणखी अडचणीत येण्याची भीती  व्यक्त होत आहे.