Fri, Apr 26, 2019 15:17होमपेज › Kolhapur › महापालिकेत कारभार्‍यांच्या विरोधात नगरसेवक

महापालिकेत कारभार्‍यांच्या विरोधात नगरसेवक

Published On: Dec 27 2017 1:30AM | Last Updated: Dec 27 2017 1:07AM

बुकमार्क करा

कोल्हापूर ः प्रतिनिधी 

कोल्हापुरातील ऐतिहासिक शालिनी सिनेटोन जागेतील भूखंड क्र. 5 व 6 हे सिनेटोनसाठीच राखीव ठेवण्याचा प्रस्ताव महापालिका सभागृहात नामंजूर करण्यात आला. हा ठराव फेरप्रस्ताव म्हणून पुन्हा सभागृहापुढे ठेवावा, अशी मागणी काही नगरसेवक करत आहेत. त्यासाठी नगरसेवकांनी सह्यांची मोहीम राबविली असून बुधवारी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना त्यासंदर्भात निवेदन दिले जाणार आहे. त्यामुळे शालिनी सिनेटोनवरून कारभार्‍यांच्या विरोधात नगरसेवक उतरल्याचे स्पष्ट होत आहे. 

काँग्रेसचे नगरसेवक दिलीप पोवार यांच्या लेटरपॅडवर निवेदन तयार केले आहे. त्यात म्हटले आहे की, 12 डिसेंबर 2017 ला महासभेत ए वॉर्ड रि. स. नं. 1104 पैकी 5 व 6 हे भूखंड शालिनी सिनेटोन या वापरासाठी आरक्षित करावे, असा ऑफिस प्रस्ताव नामंजूर करण्यात आला होता. हा विषय आमच्या कोणाच्याही लक्षात आला नाही. तसेच ऑफिस प्रस्तावाचे पूर्णपणे वाचन न करता आम्ही विषय नामंजूर केला आहे; परंतु नंतर प्रस्तावाचा आम्ही पूर्णपणे अभ्यास केल्यानंतर लक्षात आले की ऑफिस प्रस्ताव बरोबर असून तो मंजूर करणे आवश्यक आहे. महापालिका व शहराच्या दृष्टीने हा प्रस्ताव योग्य व वाजवी वाटत असून प्रस्ताव पुन्हा येणार्‍या महासभेपुढे फेरप्रस्ताव म्हणून सादर करावा, असेही निवेदनात म्हटले आहे. 

प्रस्तावावर पोवार यांच्यासह जयश्री चव्हाण, अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, भूपाल शेटे, सुरेखा शहा, प्रताप जाधव, वृषाली कदम, प्रतिज्ञा निल्ले-उत्तुरे, शोभा कवाळे, दीपा मगदूम, श्रावण फडतारे, माधुरी लाड, अशोक जाधव, परिवहन समिती सभापती नियाज खान, संदीप कवाळे, मेघा पाटील, रिना कांबळे, संजय मोहिते, राहुल चव्हाण, सरिता मोरे, अनुराधा खेडकर यांच्या स्वाक्षरी आहेत. दरम्यान, यापूर्वीच भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक किरण नकाते व ईश्‍वर परमार यांनीही फेरप्रस्ताव आणावा म्हणून निवेदन देऊन मागणी केली  आहे..