Tue, Nov 19, 2019 11:26होमपेज › Kolhapur › कोल्हापूर महानगरपालिकेचे कामगार नेते रमेश देसाई यांचे निधन

कोल्हापूर महानगरपालिकेचे कामगार नेते रमेश देसाई यांचे निधन

Published On: Jul 13 2019 1:53AM | Last Updated: Jul 13 2019 1:43AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

महापालिकेच्या कर्मचार्‍यांना न्याय मिळवून देणारे आणि गेली चाळीस वर्षे कोल्हापूर कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे रमेश हिंदुराव देसाई (वय 78) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. महापालिकेचा कामगार नेता हरपला, अशा शब्दांत महापालिका प्रशासन व पदाधिकार्‍यांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.गेल्या काही दिवसांपासून रमेश देसाई आजारी होते.

त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच महापालिका कर्मचार्‍यांनी आपले कामकाज बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. देसाई यांचा जन्म 14 जानेवारी 1943 साली कोल्हापुरात झाला. शालेय शिक्षण प्रायव्हेट हायस्कूलमध्ये झाले.  1962 साली ते नगरपालिकेत हंगामी कर्मचारी म्हणून रूजू झाले. 1966 साली ते रेकॉर्ड विभागात कायमस्वरूपी क्लार्क म्हणून रूजू झाले. 1977 साली असिस्टंट सुपरिटेंडंट म्हणून म्हणून पदोन्नती मिळाली. याचवेळी कर्मचारी संघात सचिव म्हणून ते काम पाहू लागले. 1984 साली ते महानगरपालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष झाले. त्यानंतर सलग चाळीस वर्षे त्यांनी कर्मचार्‍यांच्या हिताचे निर्णय घेतले. प व डी, आरेाग्य, सफाई कामगारांच्या समस्या प्रशासनापुढे प्रभावीपणे मांडत 1998 साली 618 कर्मचार्‍यांना कायम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 2001 साली ते सेवानिवृत्त झाले. महापालिकेचे कामगार, अधिकारी यांच्याशी संलग्नित पतसंस्थेचे मार्गदर्शक, तर महापालिका सेवकांच्या पतसंस्थेचे अध्यक्षपद तसेच 25 वर्षे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. महाराष्ट्र राज्य फेडरेशनच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी लिलया सांभाळली.

सकाळी त्यांच्या शिवाजी पेठ येथील निवासस्थापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. खरी कॉर्नर, महाद्वार रोड, पापाची तिकटीमार्गे महापालिकेत त्यांचे पार्थिव आणण्यात आले. महापौर सौ. माधवी गवंडी, आ. सतेज पाटील, मनपा आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आदरांजली वाहिली. पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, दोन मुली, चार नातवंडे असा परिवार आहे. देसाई यांच्या निधनानिमित्त बुधवार  17 जुलै रोजी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.