Fri, Aug 23, 2019 21:39होमपेज › Kolhapur › कोल्हापूर ठरतेय स्पर्धा परीक्षेची ‘पंढरी’

कोल्हापूर ठरतेय स्पर्धा परीक्षेची ‘पंढरी’

Published On: Jun 25 2018 1:47AM | Last Updated: Jun 25 2018 12:56AMकोल्हापूर : विजय पाटील 

पोलिस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेचा नुकताच निकाल लागला. यामध्ये  कोल्हापूरने शतक मारल्याचे दिसते. एका जिल्ह्यात इतक्या संख्येने पीएसआय झाल्याने साहजिकच कोल्हापूरच्या तरुणाईचा करिअरवर फोकस वाढत असल्याचे स्पष्ट आहे. यापूर्वी तहसीलदार, विक्रीकर निरीक्षक, मोटार वाहन निरीक्षक या पदांसाठी झालेल्या परीक्षेतही कोल्हापूरकरांचे प्रमाण लक्षणीय दिसून आले. कोल्हापूरच्या रांगड्या मातीत आता शिक्षणाचे रोपटे चांगलेच रुजून वाढल्याचे हे द्योतक आहे. यासह बहुतेक तरुण स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडून यश मिळवू लागल्याचेही हे निदर्शक मानायला हवे. 

स्पर्धा परीक्षेचा निकाल लागला की, एखाद-दुसरा युवक उत्तीर्ण होऊन अधिकारी झाल्याचा प्रकार काही वर्षांपर्यंत कोल्हापुरात दिसत होता. हुशारी, धमक आणि कष्ट करण्याची तयारी असूनही कोल्हापुरी तरुणाई स्पर्धा परीक्षांबाबत फारशी उत्साही दिसत नव्हती. अधेमधे कोणीतरी आयएएस, आयपीएस होत असल्याच्या बातम्या झकळत होत्या. पण, हे प्रमाण चाळीस लाख लोकसंख्या असणार्‍या  जिल्ह्यात नगण्य म्हणावे असे होते. पण, अलीकडे केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग या दोन्ही परीक्षांमध्ये तरुणाईचे प्रमाण वेगाने वाढले आहे. यासह एनडीए, बँकींग आदींमध्येही अधिकारी होणार्‍यांची संख्या मोठी आहे. 

गत महिन्यात तहसीलदार, शिक्षण अधिकारी आदी पदांच्या परीक्षेच्या जाहीर झालेल्या निकालातही कोल्हापूरचे प्रमाण लक्षवेधी होते. मोटार वाहन निरीक्षकपदाच्या परीक्षेत तर ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व समाधान देणारे दिसले. यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील मुले-मुली अधिकारी बनल्याने त्याचे सामाजिक मोल एकूणच आनंदोत्सवासारखे होते. कोणाचे वडील रिक्षाचालक होते, तर काही कुटुंबांना राहायला स्वत:चे घरही नव्हते. अशा कुटुंबातील मुले स्वत:च्या जिद्दीने अधिकारी बनत आहेत हे कोल्हापूरच्या मातीतले नवे वैशिष्ट्य दिसू लागले आहे.