होमपेज › Kolhapur › महाविद्यालयीन तरुणांवर चाकूहल्ला

महाविद्यालयीन तरुणांवर चाकूहल्ला

Published On: Dec 19 2017 1:58AM | Last Updated: Dec 19 2017 1:33AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

महाविद्यालयातील वादातून दसरा चौकात झालेल्या चाकूहल्ल्यात दोन तरुण जखमी झाले. ओंकार सचिन पालखंडे (वय 21, रा. कावळा नाका) व अजय विजय जगदाळे (वय 20, रा. शिवाजी पार्क) अशी जखमींची नावे आहेत. दसरा चौकात मित्राचा वाढदिवस साजरा करण्यास आलेल्या या दोघांवर तरुणांच्या एका गटाने हल्ला केला. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी शिवा पोवार, समर्थ सूर्यवंशी यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला. 

ताराबाई पार्कातील महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम बोंद्रे (रा. पुलाची शिरोली) याचा सोमवारी वाढदिवस होता. तो मित्रांसोबत दसरा चौकात केक कापण्यासाठी आला होता. त्याने फोनवरून मित्र ओंकार पालखंडे याला दसरा चौकात बोलावून घेतले. ओंकारचा महाविद्यालयातील काही तरुणांशी वाद झाला होता. याच वादातून तरुणांचा एक गट ओंकारच्या मागावर होता. तो दसरा चौकात आल्याची माहिती मिळताच तरुणांचा गट दसरा चौकात आला. यातील एकाकडे असणार्‍या चाकूने त्याने ओंकावर वार केला. ओंकारच्या चेहर्‍यावर वार झाला. ओंकारला सोडण्यास आलेला त्याचा मित्र अजय जगदाळे हा भांडणात सोडवणूक करण्यास गेला असता, त्यालाही चाकू लागला. प्रेम लोखंडे व कृष्णा देवकुळे या दोघांनी जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. 

वाढदिवसाचे निमित्त  वाढदिवस साजरा करण्यास जमलेले तरुण बेसावध असताना त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. दसरा चौकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकाराने धावपळ उडाली. दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. गांभीर्याने दखल नाही सकाळी बाराच्या सुमारास घडलेल्या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत करण्याचे काम सुरूच होते. जखमी ओंकार पालखंडे याने चाकू, तलवारीसारख्या धारदार शस्त्रांचा वापर झाल्याचे सांगितले. दहा ते पंधरा जणांच्या गटाकडून मारहाण झाल्याचेही उपस्थितांनी सांगितले; पण गुन्हा केवळ तिघांविरोधात दाखल करण्यात आला. यामुळे नागरिकांत पोलिसांबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती.