कोल्हापूर : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेत दुपारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागात लिपिकाने दारू पिऊन धिंगाणा घातला. शिव्यांची लाखोली वाहणार्या या लिपिकाला आवरेपर्यंत सहकारी कर्मचार्यांना नाकी नऊ आले. अखेर वरिष्ठांच्या आदेशाने लिपिकाला घरी पाठवण्यात आले. या प्रकाराची जिल्हा परिषदेत दिवसभर चर्चा सुरू होती. संबंधित कर्मचारी हा कनिष्ठ सहायक म्हणून 2013 पासून मुख्यालयात कार्यरत आहे. पन्हाळा तालुक्यात वास्तव्यास असणारा हा कर्मचारी मद्याच्या आहारी गेला असून गेल्या सहा महिन्यांपासून त्याच्या मर्कट लिलांना जिल्हा परिषद वैतागली आहे. या वर्तनासंबंधी वारंवार सूचना देऊनही त्याच्या वर्तवणुकीत फरक पडलेला नाही. दोन दिवसांपूर्वी हा लिपीक करवीर पंचायत समितीनजीक गटारीजवळ पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर सहकार्यांनी त्याला घरी पोहोचवले होते.
मध्यंतरी जिल्हा परिषदेत विभागाची अचानक तपासणी सुरू असतानाही विनापरवानगी गैरहजर आढळल्याने मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी त्याच्यावर कारवाई देखील केली होती.
दोन चार दिवसांनी अशाप्रकारे दारू पिऊन येऊन कार्यालयात धिंगाणा घालण्याचे काम तो करतो. कामावर लक्ष नसल्याने कार्यालय अधीक्षकांनी मध्यंतरी एक महिन्याचा पगारही थांबवला होता. वारंवार नोटिसाही दिल्या आहेत. तरीही सुधारणा झालेली नाही. शुक्रवारी बाराच्या सुमारास हा लिपीक जिल्हा परिषदेत आला. नेहमीप्रमाणे त्याने शिव्यांची लाखोली वाहत दंगा करण्यास सुरुवात केली. कार्यालय अधीक्षक आढावा बैठकीसाठी बाहेर असल्याने इतर कर्मचार्यांनी त्याला तेथून जाण्यास सांगितले; पण ऐकण्याच्या अवस्थेत नव्हता. या प्रकाराला वैतागलेल्या कर्मचार्यांनी वरिष्ठांकडे तक्रारही केली आहे. स्वत: या लिपिकाने आपले म्हणणे वरिष्ठांकडे दिले आहे.