Sun, May 19, 2019 13:58
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › भरदिवसा १७ लाख लुटले

भरदिवसा १७ लाख लुटले

Published On: Feb 03 2018 2:21AM | Last Updated: Feb 03 2018 2:17AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जमीन विक्री व्यवहारातील दलालांचा पाठलाग करीत तिखटपूड भिरकावून तसेच धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला करून 17 लाख  19 हजार रुपयांची रोकड हल्लेखोरांनी हातोहात लुटल्याची घटना येथील ताराराणी चौक परिसरात शुक्रवारी दुपारी घडली. गजबजलेल्या परिसरात भरदिवसा घडलेल्या थरारक घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. संशयितांच्या शोधासाठी शहरासह महामार्गावर तत्काळ नाकेबंदी करण्यात आली आहे. सशस्त्र हल्लेखोरांच्या हल्ल्यात चारुदत्त अण्णासाहेब कोगे (वय 70, रा. चिंचवाड, ता. करवीर) हे गंभीर जखमी झाले आहेत. डोक्यावर, दंडावर, बोटावर कोयत्याने वर्मी वार झाल्याने कोगे यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिनकर बंडोपंत जाधव (65, रा. शिवाजी पेठ) यांच्या तोंडावर तिखटपूड फेकून रस्त्यावर ढकलून दिल्याने त्यांनाही इजा झाली आहे.

अनपेक्षित घटनेमुळे भेदरलेल्या दलालांनी जखमी अवस्थेतही प्रतिकाराचा प्रयत्न केला. तथापि, हल्लेखोरांनी दलालांना मारहाण करीत त्यांच्याकडील 18 लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून घेतली. यावेळी झालेल्या झटापटीत दुसर्‍या एका बॅगेतील 2 लाख 81 हजार 800 रुपयांच्या नोटा रस्त्यावर विस्कटल्या. त्यामुळे ही रक्‍कम मिळून आली. हल्लेखोरांनी कोगे, जाधव यांचा रूईकर कॉलनीतील स्वामी समर्थ मंदिर, दत्तमंदिर चौक, महाडिक कॉलनी, कावळा नाका येथील राजेश मोटर्सपर्यंत दुचाकीवरून  पाठलाग केल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे दिसून आले आहे. स्थानिक हल्लेखोरांनी दलालांच्या हालचालीवर पाळत ठेवूनच हे कृत्य केले असावे, असा वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचा संशय आहे. पोलिस रेकॉर्डवरील दोघांना रात्री उशिरा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.

शहरात भरदिवसा लुटमारीची घटना घडल्याने अप्पर पोलिस अधीक्षक तिरूपती बालाजी, पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक दिनकर मोहिते यांच्यासह चारही पोलिस ठाण्यातील डझनभर अधिकार्‍यांसह डीबी पथकातील पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली होती. पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, भूमी अभिलेख कार्यालयातील निवृत्त कर्मचारी कोगे व जाधव जमीन खरेदी-विक्री व्यवहारात कमिशन एजंट म्हणून काम करतात. उद्यमनगर येथील सूर्यकांत नलावडे यांच्या मालकीच्या रूईकर कॉलनीतील साडेचार गुंठे प्लॉटचा त्यांनी आशा करण जाधव यांच्याशी विक्री व्यवहार घडवून आणला. दहा दिवसांपूर्वी व्यवहार झाला होता. बहुतांशी रक्‍कम त्याच दिवशी नलावडे यांना देण्यात आली होती. व्यवहारातील 20 लाखांची रक्‍कम शुक्रवारी (दि. 2) रोजी दुपारी देण्याचे ठरले होते.

लुटारू टोळीकडून थरारक पाठलाग!

कोगे, जाधव आज दुपारी अडीच वाजता व्यवहारातील उर्वरित 20 लाख रुपये घेण्यासाठी रूईकर कॉलनीतील आशा जाधव यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यांच्याकडून रक्‍कम घेऊन दोघेही दुचाकीवरून स्वामी समर्थ मंदिर, दत्तमंदिर चौक, महाडिक कॉलनीमार्गे कावळा नाक्याच्या दिशेने जात असतानाच तिघा संशयितांनी त्यांचा दुचाकीवरून पाठलाग सुरू केला. रूईकर कॉलनीच्या वळणावर

लुटमारीचा बेत फसला

रूईकर कॉलनीच्या वळणावर हल्लेखोरांनी दोघांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, रस्त्यावर वाहनधारकांची गर्दी झाल्याने तेथील बेत फसला. भरधाव दुचाकीवरील तिघांनी त्यानंतर कोगे, जाधव यांना राजेश मोटर्सलगत बसस्थानकासमोर रोखले.

तोंडावर तिखटपूड भिरकावली...

दुचाकी चालवणार्‍या दिनकर जाधव यांच्या दिशेने तिखटपूड भिरकावून मोटार सायकलवर हल्लेखोरांनी जोरात लाथ मारली. त्यामुळे दोघेही रस्त्यावर कोसळले. संशयितानी कोगे यांच्या हातातील दोन बॅगा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तथापि, कोगे यांनी प्रतिकाराचा प्रयत्न करीत संशयितांना ढकलून देण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत सराईतांनी कोगे यांच्यावर कोयत्यासह चाकूने सपासप वार सुरू केले.

झटापट, आरडाओरड अन् विनवणी निरर्थक ठरली!

झटापट सुरू असताना दोघांनीही आरडाओरडा केला. मदतीसाठी वाहनधारकांना विनवण्या केल्या. मात्र, सशस्त्र हल्लेखोरांमुळे मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. झटापटीत एका बॅगेतील दोन हजार, पाचशेच्या काही नोटा रस्त्यावर विखुरल्या गेल्या. मोठ्या रकमेची बॅग मात्र चोरट्यांनी हिसकावून घेत ताराराणी चौकाच्या दिशेने पलायन केले. हल्लेखोरांचा तरुणांनी केला पाठलाग! दरम्यानच्या काळात परिसरातील काही तरुण पुढे सरसावले. त्यांनी संशयितांचा पाठलाग सुरू केला; पण संशयित दुचाकीवरून पसार झाले. घटनास्थळ परिसरातील व्यावसायिकांनी शाहूपुरी पोलिस ठाणे, पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहिती दिली. वरिष्ठ अधिकार्‍यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मार्गावर नाकेबंदी केली. संशयितांचा शोध जारी केला; पण रात्रीपर्यंत कोणताही सुगावा लागला नव्हता.

टोळीच्या म्होरक्यासह  टिपरही स्थानिक?

रूईकर कॉलनीतील नलावडे यांच्या मालकीच्या जागेच्या खरेदी-विक्रीसंदर्भात दहा-बारा दिवसांपासून त्यांच्यात वाटाघाटी सुरू होत्या. या व्यवहाराची नलावडे, जाधवसह दोन्हीही दलालांना माहिती होती. व्यवहारातील उर्वरित 20 लाख रुपयांच्या रकमेची पूर्तता आज होणार होती. याची माहिती लागल्यामुळेच टोळीने लुटमारीचा कट रचला असावा, असा संशय पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्‍त केला. म्होरक्यासह साथीदारांनी कोगे, जाधव यांच्या हालचालींवर पाळत ठेवूनच हे कृत्य केले असावे, असेही ते म्हणाले.

दोन पथके सांगलीकडे

संशयितांच्या शोधासाठी एलसीबीची दोन पथके तातडीने सांगली व मिरजेला रवाना झाल्याचे सांगण्यात आले. सराईतांचा छडा लावण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी सांगली पोलिसांशी संपर्क साधला आहे.

चौकशीसाठी दोघे ताब्यात!

लुटमारीच्या गुन्ह्यातील दोन सराईतांना रात्री उशिरा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून पोलिस उपअधीक्षक डॉ. अमृतकर चौकशी करीत आहेत. लुटमारीचा प्रकार लवकरच उघडकीस येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.