Mon, May 27, 2019 08:42होमपेज › Kolhapur › बदली होऊनही टेबल सुटेना

बदली होऊनही टेबल सुटेना

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 12:37AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : नसिम सनदी 

बर्‍याच प्रतीक्षेनंतर एकदाची स्थानांतरण बदली प्रक्रिया पूर्ण झाली. पण, आता टेबल सोडण्यावरून नवा पेच निर्माण झाला आहे. 9 वरिष्ठ  व 19 कनिष्ठ सहायक अशा 28 जणांचे टेबल बदलण्यात आले आहे; पण त्यातील 6 जण अजून हजरच झालेले नाहीत. त्यातही दोघांनी हजर होण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. तर, 4 जणांना सोडण्यास खातेप्रमुखांनीच नकार दिला आहे. हजर न झाल्यास पगार थांबवण्याच्या खुद्द सीईओंच्या लेखी आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याने काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे. 

एकाच विभागात एकाच टेबलवर कर्मचार्‍यांची मक्तेदारी निर्माण होऊ नये, म्हणून दर तीन ते पाच वर्षांनी स्थानांतरण बदली करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार गेल्या वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषदेत 30 डिसेंबरला स्थानांतरण बदली प्रक्रिया राबवण्यात आली. यात 28 जणांचे टेबल बदलण्यात आले. टेेबल हा जिल्हा परिषदेतील सर्वांचाच आत्मीयतेचा विषय असल्याने तो दुसर्‍याकडे सुपूर्द करण्यावरून आणि स्वीकारण्यावरून नेहमीच वेगळ्या चर्चेत राहिला आहे. आताच्या स्थानांतरण बदल्यांमध्येही ही चर्चा जोरात सुरू आहे. 

एकदा टेबल बदलल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत बदल केला जाणार नाही, असे निक्षून सांगत सीईओंनी पदस्थापना दिलेल्या ठिकाणी हजर न झाल्यास पगार काढू नये, असे लेखी आदेशच दिले होते. तथापि, या आदेशालाच वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम जिल्हा परिषदेत सुरू आहे. बदली होऊन 10 दिवस झाले, तरी 28 पैकी 6 जणांनी अजून नवे टेबल स्वीकारलेले नाही. महिला बालकल्याणमधील कनिष्ठ सहायक भारती गायकवाड यांची माध्यमिक शिक्षण विभागात पदस्थापना दिली आहे; पण त्यांनी जाण्यास नकार दर्शवला आहे. करवीर पंचायत समितीतील कनिष्ठ सहायक संजय चव्हाण यांना मुख्यालयात ग्रामीण पाणीपुरवठा विभागात पदस्थापना देऊनही ते अद्याप हजर झालेले नाहीत.

उर्वरित चौघांना कार्यमुक्त करण्यास खुद्द खातेप्रमुखांनीच नकार दिला आहे. एका विभागातून सोडत नसल्याने दुसर्‍या विभागाने आपल्याकडील कर्मचारी सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे टेबल घेण्यावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. करवीर पंचायत समितीतील विलास रानभरे यांना मुख्यालयात पशुसंवर्धन विभागात पदस्थापना दिली आहे; पण त्यांच्याकडे दुसरा कनिष्ठ सहायक नसल्याने पंचायत समितीने त्यांना कार्यमुक्त करण्यास नकार  दिला आहे.