Sun, May 26, 2019 08:35होमपेज › Kolhapur › थर्टी फर्स्ट कडक बंदोबस्त

थर्टी फर्स्ट कडक बंदोबस्त

Published On: Dec 31 2017 1:51AM | Last Updated: Dec 30 2017 9:26PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्‍वभूमीवर पोलिस दलाने मोठी खबरदारी घेतली आहे. शहरासह जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेत सायंकाळनंतर अडीच हजारांवर पोलिसांची कुमक जिल्ह्यात रस्त्यांवर उतरणार आहे. शांतता-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणार्‍यांवर कठोर कारवाईच्या सक्‍त सूचना प्रभारी अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.

मध्यवर्ती चौक, महामार्गांवर गस्ती पथके नियुक्‍त करण्यात आली आहेत. ‘थर्टी फर्स्ट’ची धामधुम सुरू आहे. विशेष करून तरुणाईत कमालीचा उत्साह आहे. पोलिस दलानेही सरत्या वर्षाला उत्साहात निरोप देत असताना इतरांच्या आनंदावर विरजण टाकण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे; मात्र कायदा हातात घेऊन शांतता-सुव्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न झाल्यास कठोर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिला आहे.

अधिकार्‍यांची तातडीची बैठक

 ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक मोहिते यांनी जिल्ह्यातील पोलिस उपअधीक्षकांसह शहरातील सर्व पोलिस ठाण्यांतील निरीक्षकांची बैठक घेऊन सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. सायंकाळी सातनंतर पोलिसांचा फौजफाटा रस्त्यांवर उतरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अडीच हजारांवर पोलिस मध्यरात्रीपर्यंत रस्त्यांवर दिसणार आहेत. 

 तर... तळीराम रात्रभर कोठडीत! 

‘डॉल्बी’बंदी आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर तातडीने खटले दाखल करून यंत्रसामग्रीच्या जप्तीचे आदेश देण्यात आले आहेत. ओपन बारवर छापे टाकून तळीरामांना रात्रभर कोठडीत बंद करण्यात येणार आहे. दारू तस्करांच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक चौकात हुल्लडबाजी, दहशत माजविणार्‍या समाजकंटकांविरुद्ध कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुंगळ्या काढून दुचाकी वाहने भरधाव पळविणार्‍यांना रोेखण्यासाठी मध्यवर्ती चौकांसह महामार्गांवर ठिकठिकाणी गस्ती पथके नियुक्‍त करण्यात आली आहेत. 

शहरासह  इंचलकरंजी,  जयसिंगपूर, शिरोळ, कुरूंदवाड, पेठवडगाव, हुपरी, हातकणंगले, कागल, मुरगूड, मलकापूर, गारगोटी, चंदगड, आजरा, गडहिंग्लज, नेसरी पोलिस ठाण्यांतील अधिकारी, कर्मचार्‍यांना पोलिस अधीक्षकांनी सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणीच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.