Sat, Jul 20, 2019 13:48होमपेज › Kolhapur › वनौषधी खजिना बनला ब्रँडेड

वनौषधी खजिना बनला ब्रँडेड

Published On: Dec 18 2017 2:34AM | Last Updated: Dec 17 2017 9:51PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : विजय पाटील 

जंगलात तमालपत्री मिळते पोत्यानं. शिकेकाई तर असते ढिगानं . प्रत्यक्षात शहरांच्या बाजारात मात्र या वनस्पतींना औषधी म्हणून चांगली किंमत मिळते. यावर प्रक्रिया केली तर या वनस्पतींना सोन्याचा भाव असतो. आजपर्यंत दुर्लक्षीत असणार्‍या या कोल्हापुरातल्या जंगलातल्या वनौषधी ‘वनामृत’ या ब्रँडने विकल्या जाणार आहेत. या माध्यमातून महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात आल्या आहेत.

वावरुंगचा काढा अंगदुखीला जालीम मानला जातो. हिरडा, बाळ हिरडा अनेक गोष्टींसाठी उपयोगी आहे. गारदळचे बी मिळवण्यासाठी लोक सतत चौकशी करत असतात. सुंगीच्या बीयांचं असेच मूल्य आहे. या वनस्पती अनेक आजार बर्‍या करण्यासाठी रामबाण म्हणून वापरतात. पण या वनस्पती जंगलामध्ये विपूल आढळतात. त्या कुठे आणि कशा मिळतात हे स्थानिक ग्रामस्थांना ठावूक आहे. झाडाला इजा न पोहोचवता या वनस्पतींची फुलं, पान व  फळं कशी मिळवायची हे उपजत ज्ञान जंगलानजीक राहणार्‍या माणसांकडं आहे. पण या वनस्पती मात्र अद्यापपर्यंत स्थानिकांना चांगला रोजगार म्हणून उपयोगी पडत नव्हत्या. कारण ग्रामस्थांकडून कवडीमोल दराने या वनस्पतींची खरेदी आजसुद्धा केली जात होती.

स्थानिक लोकांना जंगलाचे महत्त्व माहिती आहे. त्यामुळे ही मंडळी झाडे, वेली तोडत नाहीत. उलट त्यांचे संवर्धन करण्यावर भर देतात. आता या उपजत  ज्ञानाला खर्‍या अर्थाने रोजगार मिळणार आहे. तसेच या माध्यमातून स्थानिक लोकांना उद्योजक बनविण्याचे उपक्रम  वन विभागाच्या  वतीने सुरू करण्यात आला आहे.  जंगलानजीक राहणार्‍या लोकांची वन संरक्षक समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. या समितीच्या माध्यमातून आसपास मिळणार्‍या वनौषधी मिळवण्याचे हक्क स्थानिक महिला बचत गटांना देण्यात आले आहेत. आता याच्यापुढे जाऊन या वनस्पतींवर प्रक्रिया करणारी मशिन व उपकरणे वन विभागाकडून दिली जाणार आहेत. यासाठी संबंधितांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. वनामृत या नावाने या वस्तू बाजारपेठेत आणल्या जात आहेत. जंगलसंपत्तीची एक नैसर्गिक साखळी तयार करण्यात आली आहे. जंगल संवर्धन आणि स्थानिकांना रोजगार असा दुहेरी लाभ यातून होणार आहे.