Wed, Jan 23, 2019 14:48होमपेज › Kolhapur › तत्कालीन संचालक मंडळाकडून भोगावती चे ६.५ कोटींचे नुकसान

तत्कालीन संचालक मंडळाकडून भोगावती चे ६.५ कोटींचे नुकसान

Published On: Feb 03 2018 2:25AM | Last Updated: Feb 03 2018 2:22AMकोल्हापूर : प्रतिनिधी

भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाने केलेल्या गैरव्यवहाराचा चौकशी अहवाल चौकशी अधिकारी डी. ए. चौगुले यांनी साखर सहसंचालक सचिन रावल यांच्याकडे सादर केला. या अहवालात तत्कालीन संचालकांनी कारखान्याचे 6 कोटी 53 लाख  67 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान केले असून ही रक्‍कम वसुलीसाठी पात्र आहे, असे नमूद केले आहे. यावरून संबंधित माजी संचालकांवर वरील रकमेची जबाबदारी निश्‍चित होण्याची कारवाई अटळ बनली आहे. दरम्यान, साखर सहसंचालक कार्यालयाने तातडीने पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

भोगावती साखर कारखान्यात मागील पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादी-शेकाप, जनता दल व मित्रपक्षाच्या आघाडीची सत्ता होती. या संचालकांनी माल खरेदी जादा दराने केली आणि मोलॅसिस, साखर विक्री मात्र कमी दराने केली. यामुळे कारखाना आर्थिक अडचणीत आला. तोट्याची कारणे 2012 ते 2013 च्या वार्षिक अहवालामध्ये देण्यात आली होती. त्यावरून काही सभासदांनी साखर संचालकांकडे तक्रार दाखल केली होती. तत्कालीन साखर सहसंचालक वाय. व्ही. सुर्वे यांनी या तक्रारीची  गंभीर दखल घेत कलम 83 (ए.ए.) अन्वये चौकशी करण्याचे आदेश दिले.

यासाठी चौकशी अधिकारी म्हणून विशेष लेखापरीक्षक ए. बी. तेलंग यांची नियुक्‍ती केली. दरम्यान, या चौकशीला स्थगिती मिळविण्यासाठी तत्कालीन संचालक मंडळाने प्रयत्न केला; पण न्यायालयाने चौकशी सुरू ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, चौकशी अधिकारी ए. बी. तेलंग यांची अहमदनगरला बदली झाली. त्यामुळे चौकशीचे काम रेंगाळले. यावर सभासदांनी पुन्हा तक्रार केली. अखेर साखर सहसंचालकांनी तेलंग यांची नियुक्‍ती रद्द करून चार्टर्ड अकाऊंटंट डी. ए. चौगुले यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्‍ती केली. चौगुले यांनी अहवाल साखर सहसंचालकांकडे सादर केला आहे. चौकशी अधिकार्‍यांनी  एकूण 11 प्रकरणांची चौकशी केली.

त्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचे तपासणीत आढळून आले आहे. यामध्ये कारखान्याचे 6 कोटी 53 लाख 67 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ही सर्व रक्‍कम वसूलपात्र आहे. ती वसूल करून घेणे क्रमप्राप्‍त आहे, असे मत त्यांनी नोंदवले आहे. यामुळे या कारखान्याच्या माजी संचालकांवर सहकार कायदा कलम 88 अन्वये चौकशी अटळ असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.