Sun, Aug 25, 2019 19:40होमपेज › Kolhapur › स्थायी त आवाडे-इंगवले यांच्यात वाद

स्थायी त आवाडे-इंगवले यांच्यात वाद

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 07 2018 1:11AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

विजया पाटील यांच्या जातीच्या दाखल्यावरून स्थायी सभेत सदस्य राहुल आवाडे व अरुण इंगवले यांच्यात जोरदार वाद झाला. हा प्रश्‍न जिल्हाधिकार्‍यांच्या अखत्यारीतील असल्याने त्यांच्या आदेशानुसारच पुढील कारवाई करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्यानंतर वादावर पडदा पडला. दरम्यान, स्थायीच्या सभागृहाचा वापर वैयक्तिकप्रश्‍नासाठी करण्यावरून सर्वच सभापतींनी नाराजी व्यक्त केली.  विजया पाटील या जिल्हा परिषदेच्या कबनूर मतदारसंघातून भाजपकडून दुसर्‍यांदा निवडून आल्या आहेत. तथापि यावेळी त्यांनी ओबीसी म्हणून जोडलेल्या दाखल्यावर कांता बडवे व मिलिंद कोले यांनी आक्षेप घेत तक्रार दाखल केली. यावर जातपडताळणी समितीने केलेल्या छाननीत जातीचा दाखला अवैध ठरवला होता.

यानंतर पाटील यांनी अपील केल्याने सध्या हा विषय उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. दाखला अवैध ठरल्याने त्यांना कामकाजात सहभागी  होऊ देऊ नये, अशी मागणी तक्रारदारांनी जिल्हा परिषद सीईओंकडे केली होती. तथापि हा विषय जिल्हाधिकार्‍यांच्या अखत्यारीतील असल्याने त्यांना कामकाजापासून रोखण्याचे आपल्याला अधिकार नसल्याचे जिल्हा परिषदेने स्पष्ट केले होते. त्यानंतर पाटील यांनी मागील महिन्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही हजेरी लावली होती; पण कबनूर पेयजल योजनेबाबत ठरावही केला होता. 

शनिवारी जिल्हा परिषदेत झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या ठरावावरून सदस्य राहुल आवाडे यांनी आक्षेप घेत त्यांना कामकाजात सहभागी होऊ देऊ नका, अशी मागणी केली. हा प्रश्‍न जिल्हा परिषदेशी संबंधित नसल्याने हा विषय येथे काढू नका, असे अरुण इंगवले यांनी सांगितले. यावरून दोघांमध्ये सभागृहातच वाद झाला. सामान्य प्रशासनचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनीही समजावण्याचा प्रयत्न केला. सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांनीही याबाबतीत जिल्हाधिकार्‍यांनी आदेश दिल्यास लगेच कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले. यानंतर वादावर पडदा पडला. 
हुपरीतील जि. प. च्या 6 खोल्या  भाड्याने देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या हुपरीतील बंद असलेल्या शाळेपैकी 6 खोल्या या नगरपालिका कार्यालयाला दैनंदिन कामकाजाकरिता भाडेतत्त्वावर वापरण्यास देण्याचा निर्णय स्थायीच्या बैठकीत झाला. बांधकाम विभागाला भाडेनिश्‍चितीचे आदेश देण्यात आले.

ऊर्जाबचतीसाठी गडहिंग्लजमध्ये क्लस्टर सोलरसह अन्य विजेच्या वापराबरोबरच 30 टक्के ऊर्जाबचत करणार्‍या उपकरणाचे सादरीकरण समिती सभागृहात करण्यात आले. शिकलगार यांनी केलेल्या या सादरीकरणानंतर गडहिंग्लजमध्ये गावांचे क्लस्टर तयार करून त्याचा प्रकल्प अहवाल तयार करावा. मेडा अथवा शिवाजी विद्यापीठाकडून तपासून घेऊन डीपीडीसी अथवा खासदार फंडातून निधी उपलब्ध करून देण्याबाबत भविष्यात प्रयत्न केले जाणार आहेत. सरपंचाची तातडीने

सुनावणी घेण्याचे आदेश

हातकणंगले तालुक्यातील साजणी येथील पेयजल योजनातील अनियमिततेवरून शाखा अभियंत्याची खातेनिहाय चौकशी सुरू झाली आहे. मुरुमीकरणाबाबत ग्रामसेवकांकडून वसुली झाली असून सरपंचाकडून वसुली करण्याबाबत तातडीने सरपंचाची सुनावणी लावून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करा, असे आदेश सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांनी हातकणंगलेच्या गटविकास अधिकार्‍यांना दिले आहेत. स्थायी सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला होता.