होमपेज › Kolhapur › कोल्हापूर पुराभिलेखागाराने जपलाय ‘खजिना’

कोल्हापूर पुराभिलेखागाराने जपलाय ‘खजिना’

Published On: Jun 10 2018 1:48AM | Last Updated: Jun 09 2018 11:10PMकोल्हापूर : सागर यादव 

रयतेचे स्वतंत्र सार्वभौम स्वराज्य निर्माण करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोककल्याणकारी राजवटीपासून ते  स्वराज्य रक्षक रणरागिणी ताराराणी यांच्यापर्यंत आणि सर्व जाती-धर्मियांसाठीची लोककल्याणकारी राजवट राबविणार्‍या लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्यापासून इंग्रज राजवट आणि देश स्वातंत्र्यापर्यंतच्या इतिहासाचा खजिना म्हणजे कोल्हापूर पुराभिलेखागार. तब्बल 400 वर्षांचा प्रदीर्घ इतिहास या खजिन्यातील दीड कोटी कागदपत्रात लपला आहे. या कागदपत्रांच्या जतन-संवर्धन आणि संरक्षणाचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य येथे अविरत सुरू आहे. दरवर्षी 9 जून, हा दिवस जगभर ‘आंतरराष्ट्रीय अभिलेखागारदिन’ म्हणून साजरा केला जातो यानिमित्ताने.... 

इतिहास संशोधन आणि लेखन कार्यात  ऐतिहासिक दस्तऐंवजांना अनन्य साधारण महत्त्व आहे. किंबहुना ऐतिहासिक दस्तऐंवज व कागदपत्रांच्या आधाराशिवाय इतिहास लेखन परिपूर्ण होऊच शकत नाही. यामुळेच ऐतिहासिक कागदपत्रांना इतिहास संशोधनात प्रथम दर्जाची साधने म्हणून महत्त्व देण्यात आले आहे. अशा ऐतिहासिक दस्तऐंवजांच्या जतन-संवर्धन-संरक्षणासाठी शासनाने पुराभिलेखागार (रेकॉर्ड ऑफिस) ची स्थापना केली. महाराष्ट्र शासनातर्फे मुंबई, पुणे, नागपूर आणि कोल्हापूर या ठिकाणी पुराभिलेखागाराची कार्यालये कार्यरत आहेत. 

कोल्हापूर पुराभिलेखागारात दीडकोटी कागदपत्रे...

टाऊन हॉल उद्यानासमोर सीपीआरच्या बाजूला कोल्हापूर पुराभिलेखागार कार्यालय आहे. रेकॉर्ड ऑफिस म्हणजे जमीन-मालमत्ता या संदर्भातील सात-बारा व तत्सम कागदपत्रे उपलब्ध करून देणारे ठिकाण अशी बहुतांशी सर्वसामान्य लोकांना या कार्यालयाची ओळख आहे. वास्तविक हे कार्यालय म्हणजे प्रदीर्घ इतिहासाची साक्ष देणार्‍या अस्सल कागदपत्रांचा खजिना आहे. पूर्वजांच्या इतिहासाचा वारसा भावी पिढीपर्यंत पोहोचविण्याचे हे माध्यम आहे. 

कोल्हापुरात इसवी सन 1870 च्या सुमारास संस्थानच्या हुजूर रेकॉर्डसच्या जतनासाठी एक स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले. संस्थान विलिनीकरणानंतर (इसवी सन 1949) हे कार्यालय महाराष्ट्र शासनाचा पुराभिलेख विभाग म्हणून ओळखला जाऊ लागला. कोल्हापूर पुराभिलेखागारात शिवछत्रपतींच्या काळापासून म्हणजेच 1660 पासूनची तब्बल दीड कोटीहून अधिक कागदपत्रे असून यातील बहुतांशी कागदपत्रे ‘मोडी’ लिपीत आहेत. याशिवाय करवीरकाशी असे महत्त्व असणार्‍या कोल्हापुरातील धार्मिक स्थळे, छत्रपती राजवट, ऐतिहासिक वारसा, भौगोलिक वैशिष्ट्य, हवामान, पीक-पाणी अशा प्रत्येक विषयांवर इत्यंभूत माहिती देणारी कागदपत्रे, पुस्तके पुराभिलेखागारात उपलब्ध आहेत. याचा लाभ अनेक अभ्यासक-संशोधक आवर्जुन घेत आहेत.  

आंतरराष्ट्रीय अभिलेखागारदिनाची पार्श्‍वभूमी...

राष्ट्राची संपत्ती असणार्‍या ऐतिहासिक दस्तऐंवजांचे महत्त्व भावी पिढीला कळावे. त्यांच्या जतन-संवर्धन आणि संरक्षणासाठी व्यापकतेने प्रयत्न व्हावेत या उद्देशाने आंतरराष्ट्रीय संग्रहणदिन म्हणजेच ‘अभिलेखागार दिन’ ही संकल्पना पुढे आली. पॅरिस येथे 9 जून 1948 रोजी ‘इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ आर्काइव्हस’ची स्थापना झाली. पुढे सन 2004 मध्ये व्हिएन्नामधील आंतरराष्ट्रीय काँग्रेसमध्ये 9 जून हा दिवस ‘वर्ल्ड अर्काइव्हज डे’ (जागतिक अभिलेखागार दिन) म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून जगभर 9 जून हा दिवस वर्ल्ड अर्काइव्हज हा दिवस विविध उपक्रमांनी साजरा केला जातो.