Thu, Jul 18, 2019 04:08होमपेज › Kolhapur › भटक्या जनावरांचा वाहतुकीला ‘ब्रेक’

भटक्या जनावरांचा वाहतुकीला ‘ब्रेक’

Published On: Feb 19 2018 1:22AM | Last Updated: Feb 19 2018 12:10AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शहरातील प्रमुख रस्त्यावर फिरणार्‍या भटक्या जनावरांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. यातील काही जनावराच्या कानात बिल्‍ले आहेत, तर काही जनावरांच्या गळ्यात दोर आहेत. यावरून ही जनावरे मोकाट नसून कोणाच्या तरी मालकीची आहेत. शहरात अशा जनावरांची संख्या सुमारे 300 च्यावर असल्याचे सांगण्यात येते. या जनावरांमुळे अपघात घडत असून महापालिका प्रशासनाने यात लक्ष घालून या जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. 

गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या याचा शहरात मुक्‍त वावर सुरू आहे. यातील काही जनावरे ही मोकाट आहेत, तर काही मालकाची आहेत. मोकाट म्हणून सोडल्या जाणार्‍या या जनावरांचे मालक सकाळी दुधाची धार काढून या जनावरांना सोडतात, घरातून सोडलेली ही जनावर शहरातील रस्त्यावरून थेट मंडईत येतात. तेथे व्यापार्‍यांच्या भाजीच्या पेंड्या, फळे खातात, तेथून व्यापार्‍याने हुसकावून लावले की ती कचरा कोंडळ्यात जातात. त्यानंतर सायंकाळी कासेत दूध साचल्याने धारेसाठी आणि पाडसाच्या ओढेने ही जनावर पुन्हा मालकाच्या घरी जातात. या जनावरांना ना दावे लावले ना चारा दिवसभर शहरात भटकंतीतून चारा मिळत असतो, त्यामुळे मालकांनाही त्याचा त्रास होत नाही.

मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम (बीपीएमसी अ‍ॅक्ट 1949 अनुसूची प्रकरण 149) (13) अंतर्गत नियमन 82 अन्वये मोकाट भटकणार्‍या जनावरांविषयी कायदा आहे. यामुळे कोणतेही जनावर सार्वजनिक ठिकाणी बांधता कामा नये किंवा शहराच्या भागात कोणतेही जनावर भटकू देता कामा नये, असा नियम आहे. आपल्या राज्यात 2003 पासून हा नियम लागू झालेला आहे. यामुळे अशी जनावरे जर महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आली तर महापालिका प्रशासन अशी जनावरे पकडून ती पांजरपोळ संस्थेकडे दाखल करू शकते, तसेच अशी जनावरे सोडणार्‍या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकारही महापालिकेला आहेत. महापालिकेला या कायद्याचा विसर पडला आहे की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. 

याबाबत पांजरपोळ संस्थेचे ऑनररी सेक्रेटरी बाळासाहेब मन्‍नाडे म्हणाले, शहरात मोकाट जनावरांचे प्रमुख वाढलेले आहे. रस्त्यावर ही जनावरे बसलेली असतात, त्यातून एखाद्या जनावराचा अपघात होतो. मग कोण तरी पांजरपोळमध्ये अशा जनावराला दाखल करतो. संस्थेत त्याच्यावर मोफत उपचार केले जातात आणि त्याला बरे केले जाते. त्यानंतर या जनावरांचे मालक खर्च देऊन जनावर घेऊन जातो. पण, वाहतुकीच्या द‍ृष्टीने पाहिल्यास शहरात भटकी जनावरे असू नयेत, असे त्यांनी  सांगितले.