Sun, Jul 12, 2020 00:08होमपेज › Kolhapur › अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

Published On: Dec 28 2017 1:33AM | Last Updated: Dec 28 2017 1:16AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

मानधनासह विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाकडून होत असलेल्या चालढकलीचा निषेध बुधवारी अंगणवाडी कर्मचार्‍यांनी जिल्हा परिषदेवर हल्लाबोल मोर्चा काढून केला. 10 जानेवारीपर्यंत मानधन खात्यावर जमा केले जाईल, असे आश्‍वासन घेऊन जिल्हा परिषदेच्या दारातून कर्मचार्‍यांचा ठिय्या  उठला.  सप्टेंबरमध्ये अंगणवाडी कर्मचार्‍यांनी मानधनवाढीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महिनाभर संप केला होता. त्यावेळी मंत्र्यांनी मानधन वाढीसह वेळेत देण्याचे आश्‍वासन दिले होते, पण त्याचे पालन झाले नसल्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये असंतोषाची भावना आहे. गेल्या पंधरा दिवसांत अंगणवाडी कर्मचार्‍यांनी दोनदा मोर्चा काढला. बुधवारी आयटक संलग्न असलेल्या अंगणवाडी कर्मचारी युनियनने नामदेव गावडे यांच्या नेतृत्वाखाली जि.प. वर मोर्चा काढला. 

टाऊन हॉलमधून दुपारी तीन वाजता निघालेला मोर्चा सीपीआर चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, असेंब्ली रोड, जिल्हाधिकारी कार्यालयमार्गे दुपारी चार वाजता जिल्हा परिषदेच्या दारात पोहोचला. यावेळी शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. दरम्यान, महिला बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांच्या अनुपस्थितीत विभागातीलच अधिकार्‍यांनी मागण्यांचे निवेदन गेटजवळ येऊन स्वत: स्वीकारले. मानधनाचा प्रश्‍न तांत्रिक कारणामुळे रखडला असून 10 जानेवारीपर्यंत सर्व प्रक्रिया सुरळीत होईल, असे आश्‍वासित केले. या आंदोलनात शुभांगी पाटील, सुनंदा खाडे, भारती चव्हाण, मिना पवार, जयश्री पवार, मिना पाटील, वंदना चोपडे, विद्या प्रभावळे, आक्काताई पाटील, भारती बोलाईकर, कांचन मगदूम, शकुंतला पाटील, रेखा खोत, शोभा डुबुले, रेखा ऐवाळे यांच्या अंगणवाडी कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला.