Tue, Apr 23, 2019 23:59होमपेज › Kolhapur › कोल्हापूर आणि अटलजी; प्रवास अतूट नात्याचा!

कोल्हापूर आणि अटलजी; प्रवास अतूट नात्याचा!

Published On: Aug 17 2018 1:35AM | Last Updated: Aug 17 2018 10:42AM1970 चे दशक शेतकरी कामगार पक्ष ऐन जोमात होता आणि डावे-उजवे कम्युनिस्टही कामगारांच्या चळवळीत पाय रोवू लागले होते. अशा वेळी देशात सत्तेवर असलेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला डोक्यावर गांधी टोपी घालून मिरवणंही कठीण, तर जनसंघाचे काय? जनसंघाच्या विस्ताराची योजना तत्कालीन नेते गोपाळराव माने, वि. ना. सांगलीकर, बाबुराव जोशी, विजया शिंदे, अनंत फडके आदींनी आखली होती. जनसंघामध्ये बहुजन समाजाला आणल्याशिवाय जनसंघ कार्याचा परीघ वाढणार नाही, अशी भूमिका घेऊन या नेत्यांनी कोल्हापुरात सामाजिक समरसता परिषदेचे आयोजन केले. या परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निमित्ताने अटलबिहारी वाजपेयी यांचे कोल्हापुरात पहिल्यांदा आगमन झाले. 

खरे तर जनसंघावर तेेव्हा विशिष्ट जातीचा शिक्का होता. यामुळे जनसंघ आणि सामाजिक समरसता परिषद हा विषय कोल्हापुरातील डाव्यांना काही रुचला नाही. त्यांनी शुक्रवारातील 
राजमाता जिजामाता हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या परिषदेलाच विरोध केला आणि कोल्हापूरचे सामाजिक वातावरण तापून गेले. या परिषदेला वाजपेयी दाखल झाले तेव्हा परिषद स्थळी एका बाजूला पोलिसांचा कडेकोट पोलिस बंदोबस्त आणि दुसर्‍या बाजूला डावे निदर्शक आणि मैदानाचा परिसर खचाखच भरलेला. 

या परिषदेत वाजपेयींनी केलेले भाषण श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे असल्याच्या आठवणी आजही सांगितल्या जातात. वाजपेयींनी संघावरील जातीयतेचा मुद्दा खोडून काढीत सामाजित समतेची दिंडी देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचविण्याचे आवाहन करताना केलेल्या भाषणाने केवळ श्रोत्यांच्या अंगावर शहारे आणले गेले नाहीत, तर बंदोबस्ताचे पोलिस आणि काही निदर्शकही त्यांच्या अमोघ वाणीला दाद देण्यास विसरले नाहीत.

या परिषदेला जनसंघाचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव भागवत उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतच संध्याकाळी खासबाग कुस्ती मैदानाजवळ सध्या जिथे खाऊ गल्ली भरते त्या जागेत वाजपेयींची जाहीर सभाही झाली. या सभेचे स्वागत गीत प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेले. त्याचीही एक आठवण महत्त्वाची आहे. खेबूडकर त्यावेळी घाटी दरवाजाजवळ राहायचे. विद्यार्थी परिषदेेचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. विद्यार्थी परिदेचे माधव ठाकूर वसंतराव भागवतांना घेवून त्यांच्या घरी सकाळी गेले आणि नानांना सायंकाळच्या जाहीर सभेतील स्वागत गीत लिहिण्याचा आग्रह केला. खेबूडकरांनी आपल्या पत्नीला भागवतांसाठी चहा करायला सांगितले आणि चहा स्वयंपाकघरातून बाहेरच्या खोलीत येईपर्यंत नानांनी स्वागतगीत तयार केले. ते असे ः

समानतेच्या रथी, प्रजेचा जननेता सारथी, 
गाऊया समतेची आरती.
समान संधी समाज सारा, अन्न, वस्त्र अन् एक निवारा
समतेमधुनी ममता येवो, अखंड या भारती
गाऊया समतेची आरती ॥1॥
त्याग भक्ती अन् सेवा निष्ठा, चक्रे फिरवी चार प्रतिष्ठा
घराघरांवर एकत्वाची स्वप्ने साकारती
गाऊया समतेची आरती ॥2॥

सायंकाळच्या जाहीर सभेत खेबूडकरांचे हे स्वागत गीत जेेेंव्हा गायिले गेले तेंव्हा वसंतराव भागवतांनी त्याच्या निर्मितीची कथा अटलजींना सांगितली. मग कवी मनाचे अटलजी आपल्या भाषणात हा धागा सोडतील कसा? त्यांनी खासबाग कुस्तीच्या मैदानाशेजारी सभेचा फड तर जिंकलाच, पण जाता जाता ङ्गआप तो बहुत अच्छे शीघ्र कवी हैफ अशी शाब्बासकीची थाप खेबडूकरांच्या पाठीवर मारण्यासही ते विसरले नाहीत.

    रंकाळा तलाव हे कोल्हापूरकरांचे श्रद्धास्थान. कोल्हापूरला येणारा पर्यटक त्याचे दर्शन घेतल्याशिवाय राहात नाही, हे जरी खरे असले तरी त्याची महती कुठवर पोहोचावी? खुद्द अटलजींच्या हृदयातही या तलावाला आगळेवेगळे स्थान होते, हे आता कोणाला सांगितले तर आश्‍चर्याचा धक्का बसेल. त्याची एक हृदयस्पर्शी आठवण माधव ठाकूर यांच्या संग्रही आहे. साधारण 1979 चा काळ असेल. जनता पक्षाच्या सरकारमध्ये अटलजी परराष्ट्रमंत्री होते. कोल्हापूर दौर्‍यावर आलेल्या अटलजींच्या कोल्हापूर, इचलकरंजी आणि सांगली अशा तीन सभा होत्या. कर्नल शंकरराव निकम त्याचे नियोजनप्रमुख होते, तर अटलजींच्या मदतीसाठी माधव ठाकूर यांची दिनप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. अटलजी कोल्हापूरची सभा करून सांगलीला गेले आणि तेथून इचलकरंजीची सभा आटोपून कोल्हापूरला परत आले. प्रत्येक सभेत सुमारे दीड तास उभे राहून श्रोत्यांना आपल्या वक्तृत्त्वाची मोहिनी घालणार्‍या अटलजींचा देह थकला होता. त्यांनी कोल्हापुरात येताच भोजनाला सुट्टी देवून विश्रांती करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यांचे लक्ष शासकीय विश्रामधामातील शयनकक्षात लावलेल्या एका सुंदर पोर्ट्रेटकडे गेले. त्यांनी ठाकूर यांच्याकडे हे तैलचित्र कशाचे आहे, अशी विचारणा केली. तेेंव्हा माधव ठाकूर यांनी रंकाळा तलाव असे उच्चारताच ते म्हणाले, ङ्गरंकाळा तो मुझे मालूम है, लेकीन ये बिचमे क्या है?फ रात्री साडेकराचा सुमार असेल. या छायाचित्रातील संध्यामठाने अटलजींना इतकी मोहिनी घातली, की त्यांनी माधव ठाकूर यांना या संध्यामठाचे दर्शन सकाळी घेण्याची इच्छा प्रदर्शित केली. यावेळी ठाकूर यांनी सकाळी देवीचे दर्शन घेवून साडेसात वाजता विमानाचे उड्डाण असल्याचे सांगताच ते म्हणाले, ङ्गकोल्हापुरातून निघणे आपल्या हातात आहे, यामुळे दर्शन घेतल्याखेरीज आपण कोल्हापूर सोडावयाचे नाही.फ सकाळी साडेसहा वाजता अटलजींचा ताफा महालक्ष्मी मंदिरात दाखल झाला आणि देवीचे दर्शन घेतल्यानंतर अटलजींनी मंदिरात देवीच्या शक्तीरुपाबद्दल दहा मिनिटांचे केलेले विवेचन धर्मपंडितांनाही थक्क करणारे होते. देवीचे दर्शन झाल्यानंतर  ताफा रंकाळा तलावाच्या प्रवेशद्वारावर येवून थांबला. तेंव्हा कोणास कसे ठाऊक अटलजींच्या या आगमनाचा सुगावा तत्कालिन आमदार श्रीपतराव बोंद्रे यांना लागला. अगोदरच बोंद्रेदादा रंकाळ्यावर हजर! अटलजींनी दादांना संध्यामठाविषयी माहिती विचारली. दादांनी त्यांना पूर्वपरंपरेने संध्यामठ हे नाव पुढे आल्याचे सांगितले. पण अटलजींचे समाधान झाले नाही. त्यांनी दादांना संध्या, त्रिकालसंध्या यांचे धर्मशास्त्रातील महत्त्व सांगून आपल्या विद्वत्तेचे अनोखे दर्शन दादांना घडविले. सुरक्षिततेच्या कारणामुळे अटलजी दादांच्या घरी जावू शकले नाहीत. यामुळे कासंडीतून आणलेले दूध प्राशन करून त्यांनी दादांना धन्यवाद दिले आणि पुन्हा येईन, तेंव्हा तुमच्या घरी येईन, असे सांगण्यास ते विसरले नाहीत. 

    कोल्हापुरातील जनसंघाचे संस्थापक वि. ना. सांगलीकर यांच्या कुटुंबातील अटलजींची आठवण तर त्यांच्या हृदयाच्या कुपित बंदिस्त आहे. अटलजी खासदार असताना जेंव्हा कोल्हापुरात आले, तेंव्हा त्यांचा मुक्काम वि. ना. ऊर्फ छबुराव सांगलीकर यांच्या घरी ठरलेला. या सांगलीकरांची कन्या शुभदा रमेश पाटील आपल्या कुटुंबासमवेत पर्यटनासाठी सिमला येथे गेली होती. तेंव्हा तिला पंतप्रधान अटलजी सिमल्यात विश्रांतीसाठी आल्याचे समजले. अटलजींवर अपार श्रद्धा असलेल्या या कुटुंबाचे त्यांना भेटण्यासाठी मन आसूसले होते. सांगलीकरांच्या कन्येने अटलजींच्या स्वीय सहाय्यकास भेटून वेळ मिळविण्याचा प्रयत्न केला. खूप खटपटी झाल्या. अखेर सायंकाळी पाच मिनिटांची वेळ मिळाली. या भेटीत अटलजींनी शुभदा पाटील यांना माहेर कोणते विचारले. तिने कोल्हापूर सांगताच अटलजींच्या स्मृतीपटलावर कोल्हापूरच्या स्मृती जाग्या झाल्या. त्यांनी तात्काळ छबुराव सांगलीकरांचे नाव घेतले. यावेळी शुभदाने मी छबुरावांची कन्या आहे, असे सांगताच भेटीचे वातावरणच बदलले. अटलजींच्या डोळ्यांत आनंदाश्रू जागे झाले. ङ्गतू मला मुलीसमान आहेस, तुझ्या घरचे मी आजवर अन्न खाल्ले आहे. आज तुला मी जेवू घातल्याशिवाय सोडणार नाहीफ असे सांगत अटलजींनी सायंकाळी या कुटुंबीयांसमवेत भोजन तर घेतलेच, पण गप्पांचा फडही रंगवला. एक असामान्य नेता देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्यानंतरही आपले भूतकाळातील सहकारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याशी किती आस्थेने वागतो, याचा हा वस्तुपाठ होता. या भेटीने हे कुटुंब आनंदात चिंब भिजल्यावाचून राहिले नाही. 

    राजेंद्र जोशी