Thu, Jan 17, 2019 14:15होमपेज › Kolhapur › किरणे अंबाबाईच्या गुडघ्यापर्यंत

किरणे अंबाबाईच्या गुडघ्यापर्यंत

Published On: Feb 03 2018 2:21AM | Last Updated: Feb 03 2018 1:59AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

अंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या उत्तरायण किरणोत्सवाच्या तिसर्‍या व शेवटच्या दिवशी शुक्रवारी मावळतीच्या सूर्यकिरणांनी देवीचा चरणस्पर्श केला आणि किरणे सायंकाळी ठीक 6 वाजून 19 मिनिटांनी  देवीच्या गुडघ्यापर्यंत पोहोचून डाव्या बाजूला लुप्त झाली. किरणांची तीव्रता कमी मिळाल्याने आजही किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होऊ शकला नाही. भाविकांनी मात्र मंदिर आवारात बसवण्यात आलेल्या एलईडी स्क्रीनवरून किरणोत्सव पाहण्याचा आनंद घेतला.   

साधारणतः सायंकाळी 5.30 वाजता सूर्यकिरणांचा महाद्वार रोड येथून प्रवास सुरू झाला. त्यानंतर गणपती मंदिर मागे : 5.54 वा., कासव चौक : 6. वा., पितळी उंबरा : 6.04, खजिना चौक : 6.06 वा., तिसरी पायरी : 6.13 वा., चरणस्पर्श : 6.16 वा., देवीच्या गुडघ्यापर्यंत : 6.19 वाजता किरणे पोहोचली.  किरणे गुडघ्यापर्यंत पोहोचून डाव्या बाजूला लुप्‍त झाली. त्यानंतर परंपरेनुसार देवीची आरती करण्यात आली.

दरम्यान, शनिवारी किरणोत्सव अभ्यास समितीच्या वतीने सूर्यकिरणांचा अभ्यास करण्यात येणार आहे. यावेळी किरणांमध्ये अजूनही कोणते अडथळे आहेत, याबाबत माहिती संकलित केली जाणार आहे. किरणोत्सव मार्गात सध्या अडथळ्यांची शर्यत असल्याने प्रतिवर्षी भाविकांच्या पदरी निराशा येऊ लागली आहे; परंतु आता महापालिका व देवस्थान समिती यांच्या संयुक्‍त विद्यामाने लवकरच यावर तोडगा काढला जाणार असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.