Wed, May 22, 2019 06:56होमपेज › Kolhapur › कोल्हापूरची विमानसेवा बंद?

कोल्हापूरची विमानसेवा बंद?

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 28 2018 1:24AMकोल्हापूर : प्रतिनिधी

तब्बल सहा वर्षांच्या खंडानंतर सुरू झालेली कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा अवघ्या दोन महिन्यात बंद झाली आहे. रविवार, दि. 23 पासून आजअखेरच्या तीनही फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. तांत्रिक कारणास्तव या फेर्‍या रद्द झाल्याचे कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. विमानसेवा बंदबाबत कोणताही संदेश नसल्याचे विमानतळ प्राधिकरणाचे म्हणणे आहे. कंपनीकडून बुकिंगही सुरू असल्याने प्रवाशांत संभ्रमाबरोबर संतापाचे वातावरण आहे.

केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेंतर्गत कोल्हापूर-मुंबई या मार्गावर एअर डेक्कन कंपनीने 22 एप्रिलपासून विमानसेवा सुरू केली होती. आठवड्यातून दर रविवार, मंगळवार आणि बुधवार अशी तीन दिवस ही सेवा आहे. कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू व्हावी म्हणून सातत्याने प्रयत्न सुरू होते. यामुळे ‘उडान’ योजनेंतर्गत सुरू झालेल्या या विमानसेवेला दुपारची वेळ असूनही प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला.

कोल्हापूर-मुंबई या मार्गावर 18 सीटर विमानाद्वारे कंपनीने ही सेवा सुरू केली होती. सुमारे दोन महिने ती व्यवस्थित सुरू राहिल्यानंतर रविवार दि.24 जूनपासून ती बंद झाली आहे. रविवारसह मंगळवार दि.26 व बुधवार दि.27 रोजीच्या फेर्‍या रद्द झाल्या आहेत. तांत्रिक कारणास्तव या तीनही फेर्‍या रद्द झाल्याचे कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापनाने सांगितले. विमानसेवा बंद झाल्याबाबत कंपनीकडून कोणतेही सूचना आली नसल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत विमानतळ प्राधिकरणाच्या स्थानिक अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, विमानसेवा बंद झाल्याबाबत कोणत्याही प्रकारची सूचना प्राप्त झालेली नाही. यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत नियोजित वेळापत्रकाप्रमाणे ‘फ्लाईट’च्या वेळी विमानतळावरील नियमित कामकाज सुरू राहील, असेही सांगण्यात आले.

सलग तीन फेर्‍या रद्द झाल्याने विमानसेवाच बंद झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, कंपनीकडून याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. कंपनीच्या संकेतस्थळावर 29 जुलैपर्यंतच्या ‘फ्लाईट’साठी बुकिंगही सुरू आहे. तर कंपनीच्या संकेतस्थळावर ‘फ्लाईट’च्या वेळापत्रकात 30 जूनपर्यंतचे वेळापत्रक दिसत आहे. यामुळे प्रवाशांत संभ्रमाचे वातावरण आहे. 

कोल्हापूरसह नाशिक आणि जळगाव या मार्गावरील फेर्‍याही रद्द करण्यात आल्या आहेत. या तीनही मार्गांवर कंपनीकडून एकाच विमानाद्वारे सेवा दिली जाते. यामुळे तांत्रिक कारणास्तव विमानसेवा बंद ठेवण्यात आली असेल तर कंपनीकडून त्याबाबत खुलासा होणे अपेक्षित होते. मात्र, त्याबाबत कोणतीच माहिती उपलब्ध होत नसल्याने विमानसेवेबाबत संभ्रमावस्था कायम आहे.