Mon, Aug 19, 2019 00:39होमपेज › Kolhapur › कृषी क्षेत्रातील कंपन्यांसाठी कर सवलत कोल्हापूरच्या पथ्यावर

कृषी क्षेत्रातील कंपन्यांसाठी कर सवलत कोल्हापूरच्या पथ्यावर

Published On: Feb 03 2018 2:21AM | Last Updated: Feb 02 2018 11:52PMकोल्हापूर : सुनील सकटे 

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रातील कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शंभर टक्के कर सवलतचा वर्षाव केला आहे. ही योजना कोल्हापूरकरांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. गरिबांसाठी जाहीर केेलेल्या आरोग्य योजना,  प्रधानमंत्री उजाला  (घरगुती गॅस) योजना, प्रधानमंत्री सौभाग्य (वीज जोडणी) योजना  या आणि अशा विविध योजनांमुळे येथील सर्वसामान्यांनाही लाभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सादर केेलेल्या या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास, रस्ते विकास पाणीपुरवठा धार्मिक शहर, अशा योजनांवर भर देऊन सर्वसामान्यांना कृषी क्षेत्रास प्राधान्य दिले आहे.

ग्रामीण विकासासाठी मोठी भरीव तरतूद केल्याने या निधीतून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास होण्याची संधी निर्माण झाली आहे. कृषी क्षेत्रातील 10 कोटींपर्यंत उलाढाल असणार्‍या कंपन्यांना शंभर टक्के करसवलत देऊन रोजगार निर्मितीस चालना देण्याचा प्रयत्न झाला आहे. तर कापड उद्योगासाठी राष्ट्रीय पातळीवर सात हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून मँचेस्टरनगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या इचलकरंजीतील कापड उद्योगांना याचा फायदा होणार आहे. रेल्वेस्थानकांवर वाय-फाय, सीसीटीव्ही, सरकते जीने बसविण्याच्या निर्णयाचाही कोल्हापूरला फायदा आहे. देशभरात 9 हजार कि.मी.चे राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती केली जाणार आहे. 

या प्रकल्पाची सविस्तर घोषणा झाल्यानंतरच कोल्हापूरच्या वाट्याला किती निधी आला हे समजणार आहे. गरिबांसाठी आरोग्य योजनेचा लाभ सर्वांना मिळणार आहे. दहा कोटी गरिबांना आरोग्य विमा लाभ देण्यात येणार असून पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जाणार आहेत. तर 50 कोटी कुटुंबांना पाच रुपये नाममात्र किमतीत वैद्यकीय उपचार घेता येणार आहेत. राष्ट्रीय बांबू योजनेसाठी 1290 कोटी रुपयांची भरीव तरतूद आहे. या योजनेंतर्गत कोल्हापूर वनविभागाने प्रस्ताव पाठविला असून हजारो महिलांना या निमित्ताने रोजगार निर्माण होणार आहे.  मासेमारी आणि पशुसंवर्धनसाठीही मोठी तरतूद आहे. याचा जिल्ह्यातील  पशूसंवर्धन विकास किती लाभ मिळणार, हे भविष्यात समजणार आहे.