होमपेज › Kolhapur › कृषी माल प्रक्रिया उद्योग योजनेची घोषणाच!

कृषी माल प्रक्रिया उद्योग योजनेची घोषणाच!

Published On: Dec 06 2017 2:02AM | Last Updated: Dec 05 2017 10:47PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : नसिम सनदी 

अतिरिक्त शेतमाल प्रक्रिया उद्योगाकडे वळवण्याबरोबरच शेतकरी तरुणांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून देणे या उदात्त हेतूने गेल्या मे महिन्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृषी माल प्रक्रिया उद्योग योजनेची घोषणा केली. सहा महिने उलटले तरी आजच्या घडीला एकही प्रक्रिया उद्योग उभा राहू शकलेला नाही. याबाबत कृषी विभागाशी संपर्क साधला असता योजनेसाठीच्या मार्गदर्शक सूचना अद्याप न आल्याने काय आणि कसे करायचे, याबाबतीत प्रशासकीय पातळीवर चर्चा नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ही योजना देखील घोषणाच ठरण्याची चिन्हे आहेत. 

शेतकरी आत्महत्या आणि कर्जबाजारीपणा याला शेतमालाला रास्त भाव न मिळणे हे जसे कारणीभूत आहे तसे शेतमालाचे भाव पडण्याला अतिरिक्त शेतमालही कारणीभूत आहे. हा अतिरिक्त शेतमाल प्रक्रिया उद्योगाकडे वळवल्यास भाव पडलेल्या काळातही शाश्‍वत उत्पन्न मिळवता येते. याबाबतीत शेतकरी संघटनांकडूनही वारंवार प्रक्रिया उद्योग उभारणीविषयी आग्रह धरला जातो. तीन वर्षांपूर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारमध्ये घटकपक्ष म्हणून कृषी राज्यमंत्री घेतल्यानंतर स्वाभिमानीनेही हीच मागणी लावून धरली. गेल्या मे महिन्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य सरकार कृषी माल प्रक्रिया उद्योग योजना सुरू करत असून यासाठी शेतकरी तरुणांना मागेल तेवढे कर्ज देऊ, अशी घोषणा केली होती.

त्यासाठी अ‍ॅग्रो प्रोसिसिंग कंपनी स्थापन करून त्याची नोंदणी कृषी विभागाकडे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. या घटनेला सहा महिन्यांहून अधिक काळ होऊन गेला आहे. पण अजूनही याबाबतीत प्रशासकीय पातळीवर कोणत्याच हालचाली दिसत नाहीत. कृषी विभागाकडे मात्र शेतकरी याबाबतीत विचारणा करत आहेत. पण सूचना आलेल्या नाहीत, असे सांगण्याच्या पलीकडे कृषी अधिकार्‍यांच्याही हातात काही राहिलेले नाही.