Mon, Jun 17, 2019 18:44होमपेज › Kolhapur › शैक्षणिक धोरणाविरोधात टोलसारखे आंदोलन

शैक्षणिक धोरणाविरोधात टोलसारखे आंदोलन

Published On: Dec 30 2017 1:48AM | Last Updated: Dec 30 2017 1:45AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

कमी पटाच्या शाळा बंद, खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्यास परवानगी देण्याच्या शासनाच्या अशैक्षणिक धोरणाविरोधात राज्यव्यापी टोलसारखे जनआंदोलन उभे करण्याचा निर्णय शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. पहिला टप्पा म्हणून शनिवारी (दि. 30) सायंकाळी चार वाजता शिक्षण उपसंचालकांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. शिक्षण वाचवा नागरी कृती समितीची शुक्रवारी (दि.29) बैठक झाली. याप्रसंगी विविध शैक्षणिक, सामाजिक संघटनांचे 

पदाधिकार्‍यांनी सूचना मांडल्या. अ‍ॅड. पंडित सडोलीकर यांनी महाराष्ट्राला दिशा देईल, असे आंदोलन करण्याची सूचना केली. गणी आजरेकर म्हणाले, शासनाचे चालू आहे ते बंद करण्याचे धोरण सुरु आहे. या निर्णयाने ग्रामीण विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद होणार आहे. पटसंख्या वाढविण्यासाठी शासन काहीच करत नाही. प्रा.सुभाष जाधव म्हणाले, शिक्षण, आरोग्य यातून शासन अंग काढून घेत आहे. कोठारी आयोगानुसार शिक्षणावर 6 टक्के खर्च करावा. शाळांसाठी विशेष निधी निर्माण करावा. शासनाविरोधात सर्व संघटनांनी एकत्रितपणे लढावे.

संभाजी जगदाळे म्हणाले, खासगी कंपन्यांनी सुरु केलेल्या शाळेत सामान्य माणूस शिकणार कसा? आदानी, अंबानी हे शिक्षणमहर्षी होतील. शिक्षण वाचविण्याची गरज आहे. ‘कोजिमाशि’चे नेते दादासाहेब लाड म्हणाले, शाळांचे खासगीकरण झाल्याने गरिबांची मुले 70 हजार रुपये फी असणार्‍या शाळेत कशी शिकणार आहेत. हा निर्णय शासनास मागे घेण्यास भाग पाडले पाहिजे. प्रभाकर आरडे म्हणाले, 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण शासन देण्यास जबाबदार असल्याची रचना 1994 नंतर झाली. राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणावर मोठा खर्च केला परंतु शासन जागा बळकवू पाहत आहे. जनआंदोलनाशिवाय प्रश्‍न सुटणार नाही. शाळा बंद करुन शिक्षण परिषद घ्यावी. प्रास्ताविक कॉ. गिरीश फोंडे यांनी केले. यावेळी दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, कॉ. अतुल दिघे, राजाराम वरुटे, भरत रसाळे, धर्माजी सायनेकर, सुधाकर सावंत, राजेश वरक, दत्तात्रय पाटील, बाबा पाटील, संदीप मगदूम, राजेंद्र कोरे, दिलीप माने, अशोक पोवार, रमेश मोरे, प्रसाद जाधव, किशोर घाटगे आदी उपस्थित होते.