Thu, Apr 25, 2019 18:15होमपेज › Kolhapur › औषध दुकानांवर धाडसत्र

औषध दुकानांवर धाडसत्र

Published On: Jan 22 2018 1:24AM | Last Updated: Jan 22 2018 1:21AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

जिल्ह्यातील पाच रक्‍तपेढ्या व चौदा औषध दुकानांवर अन्‍न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली आहे. कारवाईत तीन परवाने रद्द तर चार रक्‍तपेढ्यांना एक महिना रक्‍त संकलनास मज्जाव केला आहे. अकरा औषध दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. काही रक्‍तपेढ्या रक्‍तदात्यांना आमिष दाखवून रक्‍त संकलन करत आहेत. रक्‍तदानानंतर संबंधित व्यक्‍तीला भेट स्वरूपात वस्तू दिली जाते. जिल्ह्यातील अनेक रक्‍तपेढ्या गावोगावी रक्‍तसंकलन शिबिरांचे आयोजन करतात. अन्‍न व औषध विभागाच्या निकषांनुसार सर्व गोष्टींची पूर्तता असणे महत्त्वाचे असते; पण सांगली जिल्ह्यातील एका रक्‍तपेढीने ही पूर्तता केली नसल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील रक्‍तपेढ्यांची सखोल चौकशी करण्यात आली. 

रक्‍तपेढ्यांची तपासणी, रेकॉर्ड ठेवणे, तपासणीवेळी तंत्रज्ञ हजर नसणे, नियमांप्रमाणे रक्‍तपेढीचे कामकाज न चालणे, रक्‍तसाठ्याच्या ठिकाणी असलेल्या डीएमएलटीला अन्‍न-औषध प्रशासनाची मान्यता नसणे यांसह विविध त्रृटी आढळल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. तसेच जिल्ह्यातील औषध दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 14 दुकानांवर कारवाई केली आहे. विक्री बिले व औषधे खरेदी रेकॉर्ड न ठेवणे, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे देणे, दुकानात नोंदणीकृत फार्मासिस्ट नसणे आदी कारणे तपासणीत आढळली. यात 11 दुकानांचे परवाने निलंबित  तर तीन दुकानांचे परवाने कायमचे रद्द केले आहेत. नोंदणीकृत फार्मासिस्ट नसल्याने या तिन्ही दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. ही सर्व दुकाने ग्रामीण भागातीलच आहेत. 

तपासणी गतिमान करणार

जिल्ह्यातील सर्व औषध दुकाने व रक्‍तपेढ्यांची तपासणी सुरू आहे.ही तपासणी अधिक गतिमान करून दोषी आढळणार्‍या दुकानावर कारवाई करणार असल्याची माहिती  अन्‍न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्‍त म. स. जवंजाल -पाटील यांनी दिली.