Sun, Aug 25, 2019 03:38



होमपेज › Kolhapur › बायोगॅस योजनेत कोल्हापूर जिल्हा परिषद देशात प्रथम

बायोगॅस योजनेत कोल्हापूर जिल्हा परिषद देशात प्रथम

Published On: Apr 12 2018 1:26AM | Last Updated: Apr 12 2018 1:05AM



कोल्हापूर : प्रतिनिधी

बायोगॅस योजनेत देशात प्रथम येण्याचा मान कोल्हापूर जिल्हा परिषदेने यंदा पुन्हा एकदा पटकावला आहे. राज्यातही सर्वाधिक उद्दिष्ट साध्य करून अव्वल स्थान कायम ठेवले आहे. विशेष म्हणजे वाळूचे दर वाढल्याने कामे ठप्प होण्याची वेळ आली असतानाही रेडीमेड प्लांटचा पर्याय स्वीकारून 101 टक्के उद्दिष्टपूर्ती करण्यात कृषी विभागाला यश आले आहे. 

राष्ट्रीय बायोगॅस योजना देशात 1983 पासून राबवली जात आहे. या योजनेत नेहमीच नावीन्याचा ध्यास असलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेने सातत्याने अग्रस्थान पटकावले आहे. गेल्या दोन वर्षांपासून मात्र वाळूचे गगनाला भिडलेले दर, बांधकामाचे वाढलेले दर आणि अनुदान मिळण्यात अनियमितता यामुळे बायोगॅस बांधणीचे आर्थिक गणित सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले होते. 

उद्दिष्ट निम्म्याने कमी करून घेण्याचीही वेळ जिल्हा परिषदेवर आली. अनेक संकटे असतानाही कृषी विभागाने हार न मानता नेटाने काम सुरू ठेवले. विशेष म्हणजे वाळूचे दर वाढल्याने त्याऐवजी ग्रीड वापरण्यास परवानगी देण्यात आली. शिवाय, 50 हजारांचे बांधीव बायोगॅस बांधण्याऐवजी 20 ते 35 हजारांत मिळणारे रेडीमेड बायोगॅस प्लांट बसवण्यावर जास्त भर दिला. यावर्षी तब्बल 93 रेडीमेड प्लांट बसवले गेले. 

या सर्व धडपडीला चांगले यशही मिळाले. जिल्हा परिषदेने 1727 बायोगॅस बांधणीचे उद्दिष्ट असताना 1745 पूर्ण करून 101 टक्के उद्दिष्ट या वर्षात पूर्ण केले. राज्याचे उद्दिष्ट 9200 इतके होते. या उद्दिष्टाच्या तुलनेत जि.प.चा वाटा 18 टक्के इतका सर्वाधिक आहे. देश पातळीवर महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे, त्यातही देशाचे उद्दिष्ट 65 हजार 180 इतके होते. देशाच्या उद्दिष्टात राज्याचा वाटा 2.34 टक्के इतका आहे. 

1745 उद्दिष्टासह कोल्हापूर जिल्हा परिषद देशात व राज्यात प्रथम आली आहे. राज्यात अहमदनगर 1400 उद्दिष्टपूर्तीसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. पुणे तिसर्‍या, सोलापूर चौथ्या, तर सांगली पाचव्या क्रमांकावर आहेत. उर्वरित जिल्ह्यांचे आकडे पाहिल्यास किमान 14 ते कमाल 300 पर्यंत आहेत. कोल्हापूर मात्र दीड हजारांच्या वर पोहोचले आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या या वाटचालीबद्दल कौतुक होत आहे.
 

Tags : Kolhapur Zilla Parishad, biogas scheme, kolhapur news