होमपेज › Kolhapur › नाबार्डच्या राज्यव्यापी अभियानाचा कोल्हापुरात प्रारंभ

पाण्याच्या नियोजनातून समृद्धी येईल : निवेदिता माने

Published On: Aug 27 2018 5:36PM | Last Updated: Aug 27 2018 5:36PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

पाण्याच्या नियोजनपूर्वक व काटेकोर वापरातूनच खऱ्या अर्थाने समृद्धी येईल, असे प्रतिपादन माजी खासदार निवेदिता माने यांनी केले. ठिबक सिंचनासारख्या कमी पाण्यातून जास्त उत्पादनाचे प्रयोगच शेतीला भविष्यात फायदाकरुन देतील.

नाबार्डच्या वतीने राज्यव्यापी "पाण्याचा कार्यक्षम वापर" या अभियानाची सुरुवात निवेदिता माने यांच्या हस्ते झाली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवेदिता माने होत्या.

यावेळी निवेदिता माने म्हणाल्या, भौगोलिकदृष्ट्या आणि पाण्याच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हा जरी समृद्ध असला तरी पाण्याच्या अतिवापरामुळे वाढतच चाललेली नापिकी ही बाब निश्चितच चिंताजनक आहे. 

जैन इरिगेशनचे व्यवस्थापक उद्धव पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यासारख्या ठिकाणी पाणी भरपूर असताना ठिबकची गरजच काय, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडतो. पाटाच्या पाण्यामुळे जमीन खराब होईल मग पुढे काय, असा सवाल केला. ठिबकच्या पाण्यामुळे खर्च कमी होईल आणि पाण्याबरोबरच खताचेही व्यवस्थापन करता येईल. 

नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक नंदु नाईक म्हणाले, बदलत्या निसर्गाला जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांनीही आता बदलायला हवे. किफायतशीर शेतीसाठी उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढायला हवे. 

कारभारवाडीचा आदर्श घेण्‍यासारखा

करवीर तालुक्यातील कारभारवाडी येथील शंभर टक्के शेती जैन इरिगेशनच्या माध्यमातून ठिबक सिंचन केल्याबद्दल उपस्थित ग्रामस्थांचे मान्यवरांनी अभिनंदन केले. येथील विष्णू विठ्ठल साळोखे म्हणाले, पाण्याच्या अतिवापरामुळे भविष्यात येणारे महासंकट ओळखूनच आम्ही कारभारवाडीच्या ग्रामस्थांनी शंभर टक्के शेती ठिबक सिंचन केली आहे.