Wed, Mar 20, 2019 12:45होमपेज › Kolhapur › धरणांत मुबलक पाणी

धरणांत मुबलक पाणी

Published On: Feb 25 2018 1:15AM | Last Updated: Feb 24 2018 11:34PMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

सलग दोन वर्षे ओढ धरल्यानंतर गतवर्षी झालेल्या दिलासादायक पावसामुळे यंदा ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी उन्हाळ्याच्या काळात पाण्याचा जपून वापर केला, तर त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. साहजिकच, जिल्ह्यातील नागरिक पाण्याची काटकसर कशी करतात, यावर आगामी काळातील पाण्याच्या टंचाईचे चित्र अवलंबून असेल.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी, तुळशी, वारणा आणि दूधगंगा असे चार मोठे धरण प्रकल्प आहेत. त्याची एकत्रित साठवण क्षमता 1,770.34 दशलक्ष घनमीटर इतकी आहे, तर 9 मध्यम प्रकल्प आणि 54 लघुप्रकल्प याद्वारे एकूण 2,481.15 दशलक्ष घनमीटर (87.54 टीएमसी) पाण्याची साठवण क्षमता निर्माण केली आहे. या धरणांमध्ये सध्या 68 टक्के पाणी उपलब्ध आहे. गतवर्षी ही उपलब्धता 60 टक्के इतकी होती.

जिल्ह्यातील पाण्याचा प्रतिमहिना सरासरी 15 टीएमसी वापर गृहीत धरला, तर जूनअखेरीस 60 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. या तुलनेत आजमितीला धरणांमध्ये 55 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. याचा अर्थ यंदा उन्हाळ्याच्या उत्तरार्धात दोन-तीन चांगले वळीव बरसले आणि पाण्याची नियोजनपूर्वक काटकसर केली, तर नागरिकांना उन्हाळ्याच्या चटक्यांबरोबर पाण्याचे चटके बसणार नाहीत.
कोल्हापूर शहराला राधानगरी, दूधगंगा या दोन धरणांतून पिण्याचा पाणीपुरवठा होतो.

जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील राधानगरीपासून पूर्वेकडील इचलकरंजीपर्यंत नदीकाठावरील अनेक गावांना राधानगरी धरण मोठा दिलासा देते. या धरणात गतवर्षीच्या 51 टक्के पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा 70 टक्के म्हणजेच 5.41 टीएमसी पाणीसाठा आहे, तर वारणा व दूधगंगा या दोन मोठ्या धरणांमध्ये अनुक्रमे 73 व 67 टक्के पाणीसाठा आहे. यामुळे पाण्याचे उत्तम नियोजन केले, तर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष टाळता येणे शक्य आहे. अर्थातच, टंचाईचे संकट टाळणे ही प्रशासनाबरोबरच नागरिकांचीही मोठी जबाबदारी असणार आहे. ती किती समर्थपणे निभावली जाते, यावर पाणीटंचाईचे स्वरूप स्पष्ट होईल.