Fri, Jul 19, 2019 01:02होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात वाढला लाचखोरीचा टक्का

जिल्ह्यात वाढला लाचखोरीचा टक्का

Published On: Dec 19 2017 1:59AM | Last Updated: Dec 18 2017 10:55PM

बुकमार्क करा

कोल्हापूर :  दिलीप भिसे

शासकीय कचेर्‍यांतील लाचखोरी रोखण्याऐवजी या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येते आहे. महसूल, पोलिस, नगरविकासमध्ये पिळवणुकीचा टक्का वाढतो आहे. सरत्या वर्षात प्रथम श्रेणीतील 3 बडे अधिकारी, 24 कर्मचार्‍यांसह 5 पंटरवर सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंध पथकाने लाचखोरांवर कारवाईचा फास आवळला आहे.  लाचप्रकरणी महसूल (10), पोलिस (5), नगरविकास (4), ग्रामविकास (3), शिक्षण (3), वन (1), उद्योग(2), वित्त (1), सहकार (1) अशा 32 जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. लाचखोरी सर्वसामान्यांना मारक आहे. शिवाय प्रशासनाला मानहानीकारक ठरणारी आहे. लाचखोरीला सोकावलेल्यांवर कायद्याचा वचक आहे की नाही? अशी शंका निर्माण होत आहे.

प्रथम श्रेणीतील 3 वरिष्ठांसह 27 कर्मचारी, 5 पंटर जाळ्यात  लाचप्रकरणी कारवाई झालेल्यात प्रामुख्याने स्मिता कुपटे, जावेद सय्यद, कुंदन लिमकर, लक्ष्मी चव्हाण, सुनील भंडारे, दीपक गेजगे, अमित जमादार, बाळासाहेब पाटील, जनार्दन जाधव, अभय भोगे, पोपट मोहिते, दिलीप घाटगे, सदाशिव शितोळे, अवधूत रानभरे, सुशील माने, लक्ष्मी वगरे, अनुराधा मदन-हावळ, अशोक बसवणे, किरण गवळी, पंडित पोवार,  कपिल पाटील, संजय माने, राजेश कुंभार ,चंद्रकांत शिर्के, शिवाजी सुतार, तानाजी पाटील, दत्तात्रय चव्हाण यांचा समावेश आहे.  

‘महसूल’सह 9 कचेर्‍यांवर नामुष्की! लाचखोरीला रोखण्यासाठी ‘लाचलुचपत’ विभागामार्फत प्रबोधनात्मक उपक्रम राबवूनही  प्रत्यक्षात त्याची प्रभावी मात्रा लाचखोरीला सोकावलेल्या बाबूंना लागू होत नाही. गतवर्षाच्या तुलनेत जानेवारी ते 15 डिसेंबर काळात 9 शासकीय कचेर्‍यांतील 32 बाबू जाळ्यात अडकले आहेत. त्यात महसूल, पोलिस, नगरविकास, ग्रामविकास, शिक्षण, वन, उद्योग, कामगार, वित्त सहकार खात्यांचा समावेश आहे. गतवर्षी सात विभागातील 34 कर्मचारी अलगद सापडले होते.  ‘सीआयडी’चा झटका... वारणानगर येथील 9 कोटी 18 लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी कोल्हापूर ‘सीआयडी’ने सांगली पोलिसांना सरत्या वर्षात मोठा झटका दिला. ‘एलसीबी’चे तत्कालीन पोलिस अधिकारी विश्‍वनाथ घनवट, सूरज चंदनशिवेसह सात पोलिसांनी कोट्यवधीच्या रकमेवर डल्ला मारला. हा प्रकार चौकशीत उघडकीला आल्याने राज्यात खळबळ उडाली. या कृत्यामुळे पोलिस दलाला मानहानीला सामोरे जावे लागले. खाकी वर्दीचा गैरवापर करून बेकायदेशीर कृत्याला सोकावलेल्या संशयितांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले.