Sat, Nov 17, 2018 05:48होमपेज › Kolhapur › जन्माच्या चौथ्या दिवशी चिमुकली झाली पोरकी

जन्माच्या चौथ्या दिवशी चिमुकली झाली पोरकी

Published On: Dec 06 2017 2:02AM | Last Updated: Dec 05 2017 10:55PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

रुग्णवाहिकेत बाळाला जन्म दिलेल्या ऊसतोड महिलेचा उपचारादरम्यान सीपीआरमध्ये मृत्यू झाला. संगीता राजू चव्हाण (वय 26, रा. हनुमाननगर तांडा, बीड) असे मृत महिलेचे नाव आहे. शनिवारी तिने मुलीला जन्म दिला होता. जन्माच्या चौथ्याच दिवशी आईचे छत्र हरविल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

बीड येथील राजू चव्हाण आई, वडील, पत्नी आणि मुलगी अशा कुटुंबासोबत महिन्याभरापूर्वी कोल्हापुरात आला आहे. सर्वजण ऊसतोड मजूर असून, संगीता गर्भवती असल्याने बांबवडेतील चव्हाणवाडी येथील वस्तीमध्येच थांबायची. शनिवारी प्रसूती वेदना होऊ लागल्याने संगीताला तातडीने 108 रुग्णवाहिकेतून येथील शासकीय इस्पितळात (सीपीआर) आणण्यात येत होते.

यावेळी वाटेतच संगीताने मुलीला जन्म दिला. जन्मानंतर बाळ अशक्त असल्याने त्याला अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर संगीतालाही अद्याप डिस्चार्ज मिळाला नव्हता. दरम्यान, मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास संगीता चव्हाण हिच्या छातीत दुखू लागले. तिला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.