होमपेज › Kolhapur › टेम्पो ट्रॅव्हलरखाली सापडून विद्यार्थी ठार

टेम्पो ट्रॅव्हलरखाली सापडून विद्यार्थी ठार

Published On: Feb 28 2018 1:57AM | Last Updated: Feb 28 2018 1:51AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

आपटेनगर पाण्याच्या टाकीसमोरील चौकात टेम्पो ट्रॅव्हलरखाली सापडून धनंजय मोहन कुलकर्णी (वय 21, सध्या रा. आपटेनगर, मूळ खेड, रत्नागिरी) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. मृत धनंजय मूळचा रत्नागिरीतील खेडचा राहणारा असून, शिक्षणानिमित्ताने कोल्हापुरात राहण्यास होता. धनंजय येथील डी. डी. शिंदे महाविद्यालयात कला शाखेच्या तृतीय वर्षात शिकत होता. आपटेनगरात त्याने खोली भाड्याने घेतली होती.     

 सायंकाळी दुचाकीवरून तो आपटेनगर चौकातून खोलीकडे निघाला होता. आपटेनगर पाण्याच्या टाकीसमोरील चौकात वळताना तो तोल जाऊन पडला. याचवेळी पाठीमागून आलेली टेम्पो ट्रॅव्हलर त्याच्या अंगावरून गेल्याने गंभीर जखमी झाला. डोक्याला, छातीला गंभीर दुखापत होऊन प्रचंड रक्‍तस्राव झाला. त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये आणत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. याची नोंद राजवाडा पोलिसांत झाली. धनंजयचे वडील रत्नागिरीत लेथ मशीनचे शॉप चालवतात. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. तो शिक्षणासाठी सध्या कोल्हापुरात राहण्यास होता.