Wed, Jun 03, 2020 00:10होमपेज › Kolhapur › जयप्रभा स्टुडिओ जागेची फाईल महासभेत सादर करा

जयप्रभा स्टुडिओ जागेची फाईल महासभेत सादर करा

Last Updated: Mar 07 2020 1:58AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

कोल्हापूर शहरातील जयप्रभा स्टुडिओ जागेची फाईल लवकरात लवकर महासभेस सादर करा. हेरिटेज कमिटीने चुकीचा निर्णय दिला आहे. यावर महासभेत चर्चा होणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थायी समिती सभेत नगरसेवकांनी केली.

जेमस्टोनप्रकरणी बिल्डरवर काय कारवाई केली, अशी विचारणा करत या ठिकाणच्या सर्व कराराच्या प्रती भूपाल शेटे यांनी अतिरिक्‍त आयुक्‍त नितीन देसाई यांना सादर केल्या. प्रशासनाच्या वतीने कराराची तपासणी करून घेऊ, असे स्पष्ट करण्यात आले. 

सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती संदीप कवाळे होते. शारंगधर देशमुख,  सत्यजित कदम, पूजा नाईकनवरे, भूपाल शेटे, विजय सूर्यवंशी, अजित राऊत, विजयसिंह खाडे, सचिन पाटील, नियाज खान, माधुरी लाड, आदींनी चर्चेत भाग घेतला. 

अग्‍निशमनच्या रोजंदारांना कायम करा 

अग्‍निशमन विभागाकडे कर्मचारी संख्या अपुरी आहे. पुरात ठोक मानधनावरील कर्मचार्‍यांनी चांगले काम केले आहे. त्यांना महापालिकेत कायम करून घ्या. शासनाकडून मार्गदर्शन मागवा. ही सेवा अत्यावश्यक आहे. टर्न टेबल लॅडर गाडीचे काय झाले? त्या गाडीवर काम करण्यासाठी कर्मचार्‍यांना ट्रेनिंग दिले आहे का? गाडी आल्यानंतर या गोष्टी करण्याऐवजी आताच तयारी करा. इतर महापालिकेने शासनास प्रस्ताव दिला आहे, अशी विचारणा नगरसेवकांनी केली. महापालिकेच्या वतीने इतर महापालिकेकडून माहिती घेऊ, असे स्पष्ट करण्यात आले. 

कोरोनाबाबत दक्षता घ्या 

देशात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. याबाबत महापालिकेने खबरदारीची उपाययोजना काय केली आहे? औषधसाठा व इतर साहित्य उपलब्ध करुन ठेवले आहे का? 81 प्रभागातील दोन-दोन कर्मचारी काढून प्रत्येक प्रभागामध्ये धूर व औषध फवारणी करुन घ्या. आवश्यक ते मशीन फवारणी पंप ताडीने घ्या. 

शहरात जनजागृती होण्यासाठी पोस्टर्स लावा. डिजीटल बोर्ड लावा. सेवाभावी संस्थेला साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी आवाहन करा. ते साहित्य देतील, असे नगरसेवकांनी सांगितले. प्रशासनाच्यावतीने आरोग्य विभागातर्फे आवश्यक ती औषधे व फवारणी करण्यात येईल. जनजागृती करु, असे स्पष्ट करण्यात आले. 

शववाहिकांची संख्या वाढवा...

महापालिकेच्या पाच पैकी तीन शववाहिका बंद आहेत. शहराच्या दृष्टीने शववाहिका कमी पडत आहेत. खास बाब म्हणून दोन शववाहिका घ्याव्यात. किंवा सेवाभावी संस्थेकडून घ्याव्यात, अशी सूचना नगरसेवकांनी केली. बुलढाणा अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी यांनी स्वर्ग रथ तयार करुन ती ही सेवा पुरवत आहे. त्यासाठी निम्मे पैसे ते भागवतात. या गाडीवर ड्रायव्हर त्यांचाच असतो. मेन्टनन्स तेच करतात. त्यांना विनंती केल्यास ते महापालिकेला असा स्वर्ग रथ तयार करुन देतील, असे नगरसेवकांनी सांगितले. प्रशासनाच्यावतीने, त्या गाडया खूप जुन्या झाल्या आहेत. यावर्षी जी.एम.पोर्टल वरुन तातडीने 31 मार्च पुर्वी गाडी खरेदी करता येते का पाहून घेऊ. बुलढाणा अर्बन को.ऑप.सोसा.च्या व्यवस्थापकांशी चर्चा करुन अशी गाडी महापालिकेला उपलब्ध करुन देता येईल का याची पडताळणी करु, असे स्पष्ट करण्यात आले. 

1 मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरक मोहोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त स्वच्छ, सुंदर व हरीत महाराष्ट्राची संकल्पना साकारण्यासाठी 1 मार्च ते 30 एप्रिल 2020 या कालावधीत राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांत हीरक महोत्सवी महाराष्ट्र नागरी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त शहरातील उत्कृष्ठ प्रभागांना पारितोषीक देण्यात येणार आहेत. यासाठी सर्व सदस्यांनी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्‍त डॉ.मल्‍लिनाथ कलशेट्टी यांनी केले.