Thu, Jul 18, 2019 21:07होमपेज › Kolhapur › ‘टेक ऑफ’ - कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू

‘टेक ऑफ’ - कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 1:03AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मंगळवारी दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी विमान कोल्हापूर विमानतळावरून मुंबईच्या दिशेने झेपावले अन् गेल्या सहा वर्षांपासून रखडलेल्या विमानसेवेला अखेर प्रारंभ झाला. ज्यांनी कधी विमानच पाहिले नाही अशा अंध, दिव्यांग, अनाथ, कचरा वेचक महिला, शेतकरी दाम्पत्य पहिल्या हवाई सफरीने भारावून गेले. या प्रवाशांना विमानतळावर खासदार धनंजय महाडिक, संभाजीराजे यांनी शुभेच्छा दिल्या. या विमानसेवेने विकासाचे नवे पर्व सुरू होईल, असा विश्‍वास उद्योजकांनी व्यक्‍त केला.

केंद्र शासनाच्या उडान योजनेंतर्गत कोल्हापूर-मुंबई या मार्गावर एअर डेक्‍कन कंपनीच्या वतीने सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, या सेवेला मुहूर्त मिळत नव्हता. ही विमानसेवा सुरू व्हावी, याकरिता खासदार महाडिक, संभाजीराजे यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विविध पातळीवर पाठपुरावा केला. आठवड्यातून तीनवेळा असणारी ही सेवा नियमित व्हावी, वेळ बदलून मिळावी, असा आग्रह कंपनीने धरल्याने विमानसेवेला विलंब होत होता. ही सेवा तातडीने सुरू करण्याबाबत नागरी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी कंपनीला सुनावल्यानंतर अखेर आजपासून ही विमानसेवा सुरू झाली.

मुंबई-कोल्हापूर या विमानाने खासदार धनंजय महाडिक, समीर शेठ यांच्यासह उद्योजक कोल्हापुरात आले. दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी विमानाचे लँडिंग झाले. यावेळी उपस्थित विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पहिल्या प्रवाशांचे जल्लोषी स्वागत केले. कोल्हापूरहून मुंबईला जाणार्‍या प्रवाशांना पुष्पहार अर्पण करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कोल्हापूर हॉटेल चालक मालक संघाच्या वतीने प्रवाशांना उसाचा रस आणि अल्पोपाहार देण्यात आला. यावेळी महापालिका नगरसेवक सत्यजित कदम, शेखर कुसाळे, विजय सूर्यवंशी, राजसिंह शेळके, सौ. अरुंधती महाडिक आदी उपस्थित होते.

 

Tags : kolhapur, kolhapur news, Kolhapur Mumbai, Airlines, Start,