Wed, Mar 27, 2019 06:25होमपेज › Kolhapur › दिलबहार-खंडोबा तुल्यबळ लढत

दिलबहार-खंडोबा तुल्यबळ लढत

Published On: Dec 23 2017 2:06AM | Last Updated: Dec 23 2017 12:06AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

अटीतटीच्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यातील सामना तुल्यबळ झाला. खंडोबाकडून पूर्वार्धात झालेल्या गोलची परतफेड दिलबहारकडून उत्तरार्धात झाली. यानंतर मात्र संपूर्ण वेळेत दोन्ही संघांकडून दुसरा गोल न झाल्याने सामना 1-1 असा बरोबरीत सुटला यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. 

कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन ‘केएसए’ लीग फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील शुक्रवारचा सामना दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ ‘अ’ यांच्यात रंगला. प्रारंभीपासूनच दोन्ही संघांकडून जलद व आक्रमक खेळाचा अवलंब करण्यात आला. खंडोबाकडून कपील शिंदे- बालिंगकर, सागर पोवार, सुधीर कोटीकेला, अर्जुन शेतगावकर, ऋतुराज संकपाळ यांनी गोलसाठी चढाया सुरू ठेवल्या. यात त्यांना 25 व्या मिनिटाला यश आले. कपील शिंदे-बालिंगकर याने गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत 1-0 अशी आघाडी मिळविली.

एका गोलने पिछाडीवर असणार्‍या दिलबहारकडून गोल फेडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. जावेद जमादार अनिकेत जाधव, इचिबेरी इमॅन्यूयल, राहुल तळेकर, पवन माळी, विकी सुतार यांनी योजनाबद्ध चढाया सुरूच ठेवल्या. मात्र, खंडोबाचा भक्‍कम बचाव आणि गोलरक्षक रणवीर खालकर याच्या उत्कृष्ट गोल रक्षणामुळे त्यांना अपयश आले. सामन्याच्या 54 व्या मिनिटाला यश आले.

दिलबहारकडून झालेली खोलवर चढाई रोखण्याच्या प्रयत्नात खंडोबाच्या गोलक्षेत्रात कपीलकडून चेंडू हाताळला गेल्याने मुख्य पंच अभिजित गायकवाड यांनी दिलबहारला पेनल्टी बहाल केली. यावर इचिबेरी इमॅन्यूअलने बिनचूक गोल नोंदवत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. यानंतर मात्र दोन्ही संघांकडून दुसरा गोल न झाल्याने सामना बरोबरीत सुटला. सामन्यादरम्यान खंडोबाचा खेळाडू अजिज मोमीन याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.