कोल्हापूर : प्रतिनिधी
भारत राखीव बटालियनच्या खेळाडू पोलिसांना बंदोबस्त ड्युटीसह दैनंदिनी हजेरीत सवलत देण्यासाठी चाळीस हजार रुपयांची लाच घेणार्या बटालियनच्या पोलिस उपअधीक्षक तथा सहायक समादेशकासह सहा अधिकार्यांना मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. कसबा बावडा येथील राखीव बटालियनच्या कार्यालयावर छापा टाकून एकाचवेळी संशयितांना जेरबंद करण्यात आले.
पोलिस उपअधीक्षक तथा सहायक समादेशक मनोहर नारायण गवळी (वय 58, रा. बसर्गी, ता. गडहिंग्लज, सध्या रा. शिवाजी चौक, टेंबलाईवाडी, विक्रमनगर), वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकरश्रीपत सकट (56, निपाणी निमगाव, अहमदनगर, सध्या रा. कसबा बावडा), प्रमुख लिपिक राजकुमार रामचंद्र जाधव (53, लखनापूर, ता. चिक्कोडी, सध्या रा. कसबा बावडा), सहायक फौजदार रमेश भरमू शिरगुप्पे (33, संभाजीपूर, जयसिंगपूर), सहायक फौजदार आनंदा महादेव पाटील (36, बस्तवडे, कागल), पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण प्रधान कोळी (28, अब्दुललाट, शिरोळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
खेळाडू पोलिसांकडून लाचेपोटी उकळण्यात आलेल्या रकमेपैकी 27 हजार रुपयांची रक्कम भारत राखीव बटालियनचे पोलिस अधीक्षक तथा कमाडंट सपकाळ यांच्या खासगी व्यक्तीच्या नावे बँक खात्यामध्ये भरणा करण्यासाठी पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण कोळी यांच्याकडे देण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे, असे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे यांनी पत्रकारांना सांगितले.
पोलिस अधीक्षक सपकाळ यांच्या भूमिकेबाबत तपास करून त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याबाबत पावले उचलण्यात येतील, असेही गोडे यांनी सांगितले. लाचप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पोलिस उपअधीक्षक मनोहर गवळी, मधुकर सकटसह सहाही अधिकारी, कर्मचार्यांच्या घरांची रात्री उशिरा झडती घेण्यात आल्याचेही गोडे यांनी सांगितले.
पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, भारत राखीव बटालियनअंतर्गत ऑगस्ट 2018 मध्ये कंपनी क्रीडा स्पर्धा होत आहेत. स्पर्धेसाठी सर्व बटालियनच्या खेळाडूंना विविध ठिकाणी सरावासाठी पाठविण्यात आले आहे. कसबा बावडा येथील बटालियनकडे विविध कंपन्यांतर्गत 21 खेळाडू जवानांना पाठविण्यात आले आहे. संबंधित खेळाडूंना सरावासह इतर वेळेत दैनंदिनी हजेरीसह कार्यालयातील तातडीच्या कामांचे बंधन घालण्यात आले आहे. शिवाय, सरावासाठी प्रत्येक खेळाडूला दरदिवशी 175 रुपयांचा आहार भत्ताही देण्यात येतो. मात्र, याबाबतचे सर्वाधिकार राखीव बटालियनच्या स्थानिक अधिकार्यांना देण्यात आले आहेत.
पाच हजारांची मागणी अन् निलंबनाचीही धमकी
स्पर्धेत सहभागी होणार्या आणि सरावासाठी येथे दाखल खेळाडूंकडे दैनंदिनी हजेरीसह तातडीच्या बंदोबस्तात सवलत देण्यासाठी पोलिस उपअधीक्षक गवळी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सकट यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मागणी केली. संबंधित रक्कम न दिल्यास खेळाडूंना बंदोबस्तासाठी पाठविण्यात येईल, वरिष्ठांकडे खोटा अहवाल सादर करून संबंधितांना निलंबित करण्याची धमकी देण्यात आली होती. सवलत व कारवाईच्या भीतीने बहुतांशी खेळाडूंनी प्रत्येकी पाच हजार वरिष्ठाकडे जमा केले.
आहार भत्ता, कर्जासाठी बेधडक लाचेची मागणी
एका तक्रारदार खेळाडूने एसआरपीएफ सोसायटीकडे घरगुती कारणासाठी एक लाख रुपयाच्या कर्जासाठी प्रस्ताव दाखल केला होता. सोसायटीच्या कर्ज मंजुरीसाठी सहायक फौजदार तथा लिपिक रमेश शिरगुप्पे यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. प्रतिदिनी मिळणार्या 175 रुपयांच्या आहार भत्त्यापैकी प्रत्येक खेळाडूने 200 रुपये देण्याची सक्ती करण्यात आली होती.
वरिष्ठांच्या वर्तनावर उफाळला असंतोष
राखीव बटालियन कसबा बावडा येथील कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्यांनी सतत आर्थिक तगादा लावल्याने पोलिस खेळाडूंमध्ये असंतोष निर्माण झाला होता. 21 पैकी 8 खेळाडूंनी लाचेची रक्कम देण्यास विरोध केल्याने त्यांना मानसिक त्रास देण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. गेल्या काही दिवसांपासून हा त्रास असहाय्य झाला होता. काही खेळाडूंना अधिकार्यांनी निलंबनाचीही धमकी दिली होती.
कसबा बावडा येथील कार्यालयात सापळा!
वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळलेल्या खेळाडूंनी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे यांची भेट घेऊन संशयितांविरुद्ध तक्रार केली. पोलिस अधीक्षक संदीप दिवाण, अप्पर पोलिस अधीक्षक आर. आर. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक गोडे, प्रवीण पाटील, सहायक फौजदार शाम बुचडे, हवालदार मनोज खोत, शरद पोरे, नवनाथ कदम, रुपेश माने यांच्या पथकाने सापळा रचला.
चाळीस हजारांच्या रकमेची केली वाटणी
मंगळवारी सकाळी साडेअकराला एसीबीने कसबा बावडा येथील कार्यालयात सापळा लावला. त्यानुसार एका पंचासमवेत तक्रारदार पोलिस चाळीस हजार रुपयांची रक्कम घेऊन कार्यालयात गेला. त्या ठिकाणी प्रमुख लिपिक आनंदा जाधव याने संबंधित रक्कम स्वीकारली. संबंधित रकमेतील पाच हजार रुपये स्वत:कडे ठेवून त्यातील काही रक्कम पोलिस गवळी, निरीक्षक मधुकर सकट, सहायक फौजदारासह इतरांना वाटणी करून दिली.
पोलिस अधीक्षक संपकाळ यांचा 27 हजारांचा वाटा
हजेरी मेजर आनंदा पाटील यांनी पोलिस अधीक्षक सपकाळ यांच्याशी संपर्क साधून त्यांना रकमेची माहिती दिली. साहेबांच्या वाट्याला आलेली 27 हजारांची रक्कम घेऊन आनंदा पाटील हे सपकाळ यांच्या खासगी व्यक्तीच्या नावे बँकेत भरणा करण्यासाठी जात असताना पथकाने त्यांना रकमेसह ताब्यात घेतले आहे, असे पोलिस उपअधीक्षक गोडे यांनी पत्रकारांना सांगितले.
अधिकारी, कर्मचार्यांची उडाली तारांबळ
भारत राखीव बटालियनच्या पोलिस उपअधीक्षकांसह सहा जणांना पथकाने लाचप्रकरणी ताब्यात घेतल्याची माहिती परिसरात वार्यासारखी पसरली. त्यामुळे कार्यालयासह परिसरात अधिकारी, कर्मचार्यांची अक्षरश: भंबेरी उडाली. अवघ्या काही क्षणात सन्नाटा पसरला होता. दुपारनंतर तर कार्यालय निर्मनुष्य झाले होते.
पोलिस अधीक्षक सपकाळ यांची होणार चौकशी : गोडे
लाचप्रकरणी जेरबंद अधिकारी, कर्मचार्यांच्या जबाबात अधीक्षक सपकाळ यांचे नाव निष्पन्न झाले आहे. शिवाय, 27 हजार रुपयांच्या रकमेबाबत त्यांच्या नावाचा संदर्भ आल्याने त्यांच्याकडे चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीत दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असेही गोडे यांनी सांगितले.
बटालियन, पोलिस दलातील एसीबीची सर्वात मोठी कारवाई
बटालियनसह पोलिस दलातील एसीबीची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात आले. वरिष्ठाधिकार्यांसह सहा जणांना अटक करण्यात आल्याने एसीबीच्या वरिष्ठाधिकार्यांनी पोलिस उपअधीक्षक गोडे व अन्य अधिकार्यांशी तातडीने संपर्क साधून तपासात निष्पन्न होणार्या तपशिलाची माहिती घेतली.