Tue, Jun 02, 2020 21:55होमपेज › Kolhapur › शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ अध्यक्षपदी किशोरी पसारे

शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ अध्यक्षपदी किशोरी पसारे

Published On: Feb 28 2018 1:16AM | Last Updated: Feb 27 2018 11:54PM कोल्हापूर : प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदी कमला महाविद्यालयाची  विद्यार्थिनी किशोरी राजू पसारे, तर सचिवपदी सातारा येथील आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनचा विद्यार्थी अमित विकास भिसे यांची बिनविरोध निवड झाली. व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात मंगळवारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडीनंतर विद्यापीठ कॅम्पसमध्ये समर्थकांनी गुलालाची उधळण व आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.  अध्यक्षपदासाठी दोन, तर सचिवपदासाठी पाच उमेदवार असताना विद्यार्थी नेत्यांना निवडणूक टाळण्यात यश आले.   

विद्यार्थी कल्याण मंडळाच्या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अध्यक्ष व सचिवपदासाठी अनुक्रमे दोन व पाच जण इच्छुक होते. अर्ज भरताना बिनविरोधाचे प्रयत्न फोल ठरले होते. अध्यक्षपदासाठी न्यू कॉलेजमधील अभिषेक श्रीराम व पसारे यांच्यात लढत होईल, असे वातावरण होते; परंतु श्रीराम यांनी माघार घेतल्याने पसारे विजयी झाल्या. सचिवपदासाठी कराड तालुक्यातील उंब्रज येथील मंगलताई रामचंद्र जगताप महाविद्यालयातील नम्रता काटवटे, सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी (ता. पलूस) येथील आर्ट, सायन्स, अँड कॉमर्स कॉलेजमधील शुभांगी नलवडे, सातारा येथील इस्लामसाहेब मुल्ला लॉ कॉलेजमधील विशाल मंद्रे यांनी भरलेले अर्ज माघार घेतले.

यानंतर भिसे यांना विजयी घोषित करण्यात आले. निवडीनंतर कुलगुरू डॉ. शिंदे यांनी विजयी उमेदवारांना ग्रंथ भेट देऊन अभिनंदन केले. दरम्यान, निवडीनंतर विद्यार्थ्यांनी मोटारसायकल रॅली काढून जल्लोष केला. विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदी किशोरी पसारे हिच्या रूपाने मुलीला संधी मिळाली असल्याने जल्लोषात विद्यार्थिनींचा सहभाग मोठा होता. निवडीनंतर राजारामपुरी परिसरात विजेत्यांचे डिजिटल फलक झळकले. तसेच सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता.  विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत राहणार असल्याची प्रतिक्रिया पसारे व भिसे यांनी व्यक्‍त केली. दोघेही शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे आहेत. निवडीनंतर दोघांचे डी. वाय. पाटील ग्रुपचे ऋतुराज पाटील यांनी अभिनंदन केले.