Tue, Mar 26, 2019 22:01होमपेज › Kolhapur › ब्लॉग : कोल्हापूरकरांना शरद पवारांच्या मनातलं कळलंच नाही

ब्लॉग : कोल्हापूरकरांना शरद पवारांच्या मनातलं कळलंच नाही

Published On: Feb 13 2018 2:04AM | Last Updated: Feb 13 2018 2:04AMकोल्हापूर  : विठ्ठल पाटील

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनातलं राजकारण कोल्हापूरकरांना खरंच कळलंच नाही. लोकसभा निवडणुकीला अजून वर्षभराचा अवधी आहे. तरीही उमेदवार कोण ही चर्चा फक्‍त कोल्हापूर मतदारसंघापुरतीच सुरू आहे. पक्षाचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक आणि जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यातील विसंवाद हे या चर्चेचे कारण असेल, पण पवारांचा द‍ृष्टिकोन काहीसा वेगळाच असावा, असे संकेत मात्र जरूर मिळाले. पवार दौरा आटोपून गेले आणि मागे महापालिकेत वेगळेच नाट्य घडले, की जे कोणाला मारक आणि कोणाला तारक असावे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
अर्धशतकाहून अधिक असा प्रदीर्घ काळ राजकारणात घालविलेल्या पवारांच्या मनाचा ठाव अद्याप तरी कोणालाच घेता आला नाही, हे यापूर्वी अनेकदा राजकीय विश्‍लेषकांनी स्पष्ट केले आहे.

कोणाच्या पाठीत खंजीर खुपसण्यापासून ते काही जणांना यशोशिखरावर नेण्यात पटाईतपणा आणि चाणाक्षपणा केवळ पवारांनीच दाखवावा, असाही मतप्रवाह आहे. यशवंतराव चव्हाण किंवा वसंतदादा पाटील या एकेकाळच्या राजकारणातील धुरिनांनाही मागे टाकत सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याचा पवार यांचा हातखंडा आतापर्यंतच्या त्यांच्या राजकीय जीवनात खूपवेळा चर्चिला गेला. तर सर्वसामान्यांसाठी राजकारण करीत असताना त्यांचाच विकास डोळ्यासमोर ठेवायचा असेल तर सत्तेपासून दूर राहून कसे चालेल या पवार यांच्या प्रश्‍नातही अनेक उत्तरे दडली असल्याचे अनेक नेत्यांनी अनुभवले आहे.
पवार बोलतील त्याच्या नेमके उलटे घडले तर वावगे वाटू नये, असेही काही राजकीय जाणकारांनी यापूर्वी अनेकदा स्पष्ट केले आहे.

त्यामुळे कोल्हापूर जिल्हा दौर्‍यावर आल्यानंतर पवार यांनी जी वक्‍तव्ये केली असतील त्याच्या उलटे काही घडले तर आश्‍चर्य कशाला मानायचे, असे कोल्हापूरच्या राजकारणात बोलले जात आहे. 10 आणि 11 फेब्रुवारी या दोन दिवसांत जे कार्यक्रम झाले त्यात पवार जे बोलले त्याचे विश्‍लेषण सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यातील महत्त्वाचा कार्यक्रम होता तो म्हणजे कै. सदाशिवराव मंडलिक यांच्या नावाने सुरू असलेल्या  फौंडेशनच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचा. सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव प्रा. संजय मंडलिक यांनी आयोजित केलेल्या या समारंभाला पवार येणार हाच मुद्दा महत्वाचा होता. कारण प्रा. मंडलिक लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्यांना पवार यांच्या आशिर्वादाची गरज आहे. 

राजकारणात पहिल्यापासून पवार यांच्यासोबत असणार्‍या तसेच चारवेळा आमदार आणि खासदार झालेल्या मंडलिक यांचे अखेरच्या टप्यात पवारांबरोबर बिनसले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून शिष्य हसन मुश्रीफ यांच्याबरोबर खटका उडाला आणि या दोघातील वाद इतका विकोपाला गेला, की मंडलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला. लोकसभा निवडणुक पक्षाच्याविरोधात जाऊन लढविली. त्यावेळच्या प्रचारात अगदी म्हातारा बैल असे विशेषण पवार यांच्याकडून मंडलिक यांना दिले गेले हे राष्ट्रवादीचे आणि मंडलिक यांचेही कार्यकर्ते विसरलेले नाहीत. पवार आणि मंडलिक यांच्या वादाला आपणच कारणीभूत असल्याचे कबुल करून मुश्रीफ यांनी मंडलिक पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रा. मंडलिक यांना खासदार करण्याचे सुतोवाच केले.

मंडलिक पिता-पुत्रांना लोकसभेला पराभूत करण्यासाठी प्रयत्न केलेले मुश्रीफ आता प्रा. मंडलिक यांना खासदार करण्याचा विडा उचलत आहेत. यामागे खा. महाडिक यांच्याबद्धलची नाराजी दडली असल्याचे कार्यकर्ते बोलत आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांना खासदार केले, पण मदत करणार्‍या सतेज पाटील यांना महाडिक यांनी डावलले तोही राग मुश्रीफ यांना आहे. सतेज पाटील यांचा पैरा फेडण्याची संधी काहीप्रमाणात विधान परिषदेच्या निवडणुकीत मुश्रीफ यांनी साधली, पण खरी संधी त्यांना लोकसभा निवडणुकीत महाडिकांऐवजी दुसरा खासदार करून साधायची हे एव्हाना जाणकारांना समजले आहे.

हे सर्व पाहता मंडलिक फौंडेशनच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला पवार यांना आणून लोकसभा निवडणुकीसाठी ते प्रा. मंडलिक यांना पाठींबा जाहीर करतील, अशी अपेक्षा होती. राजकीय क्षेत्राचे लक्ष त्यामुळेच पवार यांच्या दौर्‍याकडे लागले होते. प्रत्यक्षात पवार यांनी या प्रतिक्षेला बगल देत आपला चतुरपणा दाखविला. प्रा. मंडलिक यांना आशिर्वाद देत असतानाच खा. महाडिक यांच्या घरी चहापान केले. माझ्या मनात काय ते कार्यकर्त्यांना माहिती असल्याचे सुचक विधान केले आणि ते परत जाताच महापालिकेच्या स्थायी समिती सभेच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत होऊन भाजपचा सभापती झाला. खा. त्यामुळे महाडिक यांनी भाजपच्या नगरसेवकांची पवार यांच्याबरोबर घालून दिलेल्या भेटीची आठवण अनेकांना झाली. साहजिकच पवारांच्या मनाचा ठाव नेमका कसा घ्यायचा असा बाका प्रश्‍न राष्ट्रवादीच्याच नव्हे तर जिल्ह्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना पडल्यावाचून राहणार नाही, हेसुद्धा तितकेच महत्वाचे असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा रणांगणानंतरच चित्र स्पष्ट

खा. महाडिक राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर विजयी झाले असले तरी अलीकडे त्यांचा भाजपबरोबर अधिक संपर्क असल्याची तक्रार पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे. आ. मुश्रीफ यांचाही त्यामुळेच रोष असून आतापर्यंत विकासकामांचे श्रेय घेत असताना खा. महाडिक यांनी त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सहकार्य लाभल्याचे प्रसिद्ध केले आहे. चुलत बंधू अमल महाडिक भाजपचे आमदार असून, चुलते माजी आमदार महादेवराव महाडिकसुद्धा अप्रत्यक्षरीत्या भाजपलाच सहकार्य करीत आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत खा. महाडिक यांनी राष्ट्रवादीऐवजी भाजपधार्जिणे धोरण अवलंबिल्याचा आरोप मुश्रीफांसह कार्यकर्ते करीत आहेत. त्यामुळेच त्यांना लोकसभेला पुन्हा राष्ट्रवादीची उमेदवारी मिळू नये यासाठी मुश्रीफांसह कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. लोकसभेचे खरे रणांगण सुरू होईल तेव्हा कोण कोणाच्या छावणीत असणार हे आता काळच स्पष्ट करेल.