होमपेज › Kolhapur › शिक्षकांना हजर करून न घेणार्‍या शाळांतील रिक्त पदे रद्द होणार

शिक्षकांना हजर करून न घेणार्‍या शाळांतील रिक्त पदे रद्द होणार

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 12:13AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करूनही त्यांना हजर करून घेण्यास टाळाटाळ करणार्‍या शाळांतील मुख्याध्यापक व संस्थांवर अनुदान रोखण्याची कारवाई करून देखील न जुमानल्यामुळे अखेर अंतिम कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अशा शाळेतील रिक्त जागाच रद्द करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्याचे आदेश शासनाकडून आल्याने माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी मुख्याध्यापक व संस्थांना नोटीस बजावली आहे. खुलासा देण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई सुरू केली जाणार आहे. जिल्हा परिषदेने 2016-17 च्या संचमान्यतेनुसार खासगी माध्यमिक शाळांमधून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची ऑनलाईन पद्धतीने समायोजन प्रक्रिया ऑक्टोबरपासून राबवली आहे.

96 शिक्षकांचे समायोजन झाले. यापैकी 25 जणांना शाळांनी हजर करून घेतले आहे. 4 शिक्षकांची कोर्टकेस चालू आहे तर 2 शिक्षकांना शाळांनी कार्यमुक्तच केलेले नाही. उर्वरित 71 जणांना हजर करून घेण्यास गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षण संस्थांनी टाळाटाळ चालवली आहे. या शिक्षकांनी माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांकडे धाव घेतल्यानंतर त्यांनी मुख्याध्यापकांचे 1 डिसेंबरपासून वेतन रोखण्याचे आदेश दिले. तसेच वेतनेत्तर अनुदान रोखण्याचीही नोटीस दिली. शिवाय यासंदर्भात जिल्हा परिषदेने  पुण्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांकडे धाव घेतली. शिक्षण संचालकांनी अशाप्रकारे हजर करून घेण्यास टाळाटाळ करणार्‍या शाळांतील रिक्त जागाच रद्द करण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना दिले आहेत.