Sat, Jul 20, 2019 22:03होमपेज › Kolhapur › लूटमार प्रकरणातील नावे निष्पन्‍न

लूटमार प्रकरणातील नावे निष्पन्‍न

Published On: Feb 04 2018 1:50AM | Last Updated: Feb 04 2018 12:59AMकोल्हापूर : प्रतिनिधी

ताराराणी चौक परिसरात इस्टेट एजंटावर हल्ला करून झालेल्या लूटमारप्रकरणी पोलिसांच्या हाती अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. टोळीच्या म्होरक्यासह साथीदार स्थानिक असून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचेही निष्पन्‍न झाले आहे. लुटीतील 17 लाखांच्या रकमेसह पसार झालेल्या संशयितांच्या अटकेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी शनिवारी रात्री त्यास दुजोरा दिला.

लूटमारीचा कट रचणार्‍या म्होरक्यासह सहा सराईतांची नावेही चौकशीत निष्पन्‍न झाली आहेत. त्यात शहरातील चार व शिंगणापूर परिसरातील दोघांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोबाईल स्विच ऑफ केल्यामुळे लुटारूंचा माग काढण्यास अडचणी येत असल्या तरी 

रविवारी सायंकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल, असेही वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. 

दोघा वृद्ध इस्टेट एजंटांच्या डोळ्यांत तिखटपूड फेकून तसेच कोयत्याने वार करून सुमारे 17 लाख 19 हजारांची रोकड हातोहात लंपास केल्याची घटना शुक्रवारी (दि.2) येथील ताराराणी चौक परिसरात घडली होती. मध्यवर्ती व वर्दळीच्या ठिकाणी भरदिवसा घडलेल्या लूटमारीमुळे शहर, जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

पोलिस अधीक्षक संजय मोहिते, पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी टोळीचा कोणत्याही स्थितीत छडा लावण्याच्या उद्देशाने सहा तपास पथकांची नियुक्‍ती केली होती. पथकातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी शुक्रवारी सायंकाळपासून पोलिस रेकॉर्डवरील 45 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला होता. सीसीटीव्ही फुटेजमधील एका संशयिताचा सुगावा लागल्यानंतर मात्र रात्रीपर्यंत टोळीतील सर्वच सराईतांची नावे निष्पन्‍न झाल्याचे समजते. मात्र, याबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली आहे. 

 पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत संबंधित इस्टेट एजंटांच्या हालचालींवर संशयितांनी दोन दिवसांपासून पाळत ठेवल्याचीही माहिती पुढे आली आहे. सराईत टोळीला मोठ्या रकमेची टिप कोणी दिली, याचाही लवकरच उलगडा होईल, असेही वरिष्ठ सूत्रांकडून समजते. टोळीतील तीन साथीदार रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने संबंधितांच्या घरासमोर तसेच नातेवाईकांच्या हालचालींवर विशेष पथकाने नजर ठेवली आहे.