Sun, Mar 24, 2019 16:54होमपेज › Kolhapur › गांधीनगर परिसरातील आरक्षित जमीन महापालिकेने ताब्यात घ्यावी

गांधीनगर परिसरातील आरक्षित जमीन महापालिकेने ताब्यात घ्यावी

Published On: Feb 25 2018 1:15AM | Last Updated: Feb 24 2018 10:59PMकोल्हापूर : प्रतिनिधी

गांधीनगर परिसरात जवळपास 23 एकर जमीन महापालिकेची असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने त्याचा ताबा घेऊन तेथील अतिक्रमणे त्वरित हटवावीत, अशी मागणी माजी नगरसेवक अनिल कदम यांनी केली आहे. लँडमाफियांनी हडप केेलेल्या या जमिनीबाबत 2012 पासून दिलेल्या आपल्या लढ्याला यश आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कदम यांनी याबाबतच्या पत्रकात म्हटले आहे, की ही जमीन महापालिकेची नसून उचगाव ग्राम पंचायतीची असल्याचा दावा केला गेला होता.

ग्रामपंचायतीचा हा दावा फेटाळत उच्च न्यायालयाने कोल्हापूर महापालिकेच्या बाजूने निकाल दिला आहे. आपण याबाबत सातत्याने न्यायालयीन प्रक्रियेत असून न्यायालयावर आपला दृढ विश्‍वास असल्यानेच या निकालाने लँडमाफियांना झटका बसला आहे. या मोकळ्या जागेवर टोलेजंग इमारती बांधून लँडमाफियांनी जागा बळकावली होती.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपिल करून स्थगिती घेतली जाऊ नये यासाठी महापालिका आयुक्तांना भेटून तातडीने कॅव्हेट दाखल करण्याबाबत लेखी पत्र दिले आहे. तसेच ही जागा तातडीने ताब्यात घेऊन अतिक्रमणे हटवावीत, तसेच तेथे ट्रक टर्निनन्स, कचरा डेपो आणि नो डेव्हलपमेंट झोन अशा असणार्‍या आरक्षणांची अंमलबजावणीही सत्वर करावी, अशी मागणी केली असल्याचे कदम यांनी पत्रकात म्हटले आहे.