कोल्हापूर : प्रतिनिधी
आरक्षण मागणीसाठी मराठा संघटनांनी राज्यात 56 मोर्चे काढले. सरकारला निवेदने दिली; पण सरकारकडून काहीच झाले नाही. उलट मराठा संघटनांंना आमिषे दाखवून दाबून ठेवण्याचे काम केले आहे, असा आरोप करत आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाग आणण्याची गरज आहे. त्यासाठी मराठा समाजातील 17 संघटनांना एकत्र घेऊन 12 मार्च रोजी कोल्हापुरात गोलमेज परिषद आयोजित करण्यात येईल. या परिषदेत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल, अशी घोषणा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केली.
मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनाची दिशी ठरविण्यासाठी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. शाहू स्मारक भवनमध्ये मेळावा झाला. अध्यक्षस्थानी बाळ घाटगे होते. आरक्षणासंदर्भात अनेक मोर्चे झाले. पण सरकारकडून काहीच पदरात पडले नसल्याचे सांगून पाटील म्हणाले, यासाठी आता सरकार विरोधात आंदोलनाची चिंगारी पेटविण्याची गरज आहे. यासाठी गोलमेज परिषद घेण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाचा विषय सुरूच आहे. तोपर्यंत मराठा समाजातील मुला-मुलींना येत्या शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी शैक्षणिक शुल्क सरकारने भरावे.
अन्यथा जनक्षोभ उसळेल
यापूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारच्या मंत्र्यांना मराठा आरक्षणाबाबत अनेक निवेदने दिली. पण त्यांनी त्याला केराची टोपली दाखवली. पण आता मराठा समाजातील युवक जागृत झाला आहे. सरकारने आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष ना. चंद्रकांत पाटील यांनी यात लक्ष घालून मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी घ्यावी, अन्यथा जनक्षोभ उसळेल. बाळ घाटगे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने राज्यात मोर्चे काढले.
पण सरकारने याची दखलही घेतली नाही. आता तर मोर्चातील अनेकजण या विषयावर काहीच बोलत नाहीत. राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शासनाच्या मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत. येत्या अधिवेशनात मराठा आरक्षण ठराव मंजूर करावा. अन्यथा पुढील अधिवेशनासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना सोडणार नाही, असे आंदोलन केले जाईल. स्वागत राजू सावंत यांनी केले. यावेळी अॅड. सुरेश कुराडे, श्रीकांत भोसले, किशोर घाटगे, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. आभार मधुकर पाटील यांनी मानले.