Fri, Apr 19, 2019 11:58होमपेज › Kolhapur › सजली मैफल रंगसुरांची (video)

सजली मैफल रंगसुरांची (video)

Published On: Jan 22 2018 12:51AM | Last Updated: Jan 22 2018 12:47AMकोल्हापूर : प्रतिनिधी

ऐतिहासिक टाऊन हॉल बागेतील हिरवळीवर रविवारी (दि. 21) रंगावलीसह शिल्प आणि रंगसुरांची मैफल सजली. कलासंस्कृती आणि नावीन्याची ही सुरेल सकाळ कोल्हापूरकरांसाठी आनंदाची पर्वणी ठरली. मैफलीत चित्र, शिल्प, गायन, हस्तकला, रंगावली, रचनाशिल्प, प्रात्यक्षिके कलाकारांनी सादर करत उपस्थितांची मने जिंकली. रंगबहार संस्थेतर्फे कलातपस्वी आबालाल रेहमान, कलामहर्षी बाबुराव पेंटर, आणि विश्‍वरंग विश्‍वनाथ नागेशकर यांच्या स्मृतिसोहळ्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवोदित कलाकारांसह जुन्या कलाकारांनी कलाविष्कार सादर केले. संस्थेतर्फे यंदा ज्येष्ठ चित्रकार दिनकर विष्णू तथा डी. व्ही वडणगेकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव, व्ही. बी. पाटील आणि डॉ. प्रवीण हेंद्रे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.  

चित्रकार, शिल्पकार, मांडणी शिल्पकार, आरोगामी आणि रांगोळी साकारणार्‍या कलाकारांचा मेळावा जमला होता. कलामंदिर महाविद्यालयाच्या शिल्पकला आणि पेंटिंग विभागातील एकूण 24 कलाकारांनी महोत्सवात सहभाग घेतला. यावेळी गौरी पाध्ये यांनी सादर केलेल्या शास्त्रीय संगीतावर रसिक मंत्रमुग्ध झाले. प्रशांत देसाई (तबला) अमित साळोखे (हार्मोनियम) यांनी संगीतसाथ केली. महोत्सवात कोल्हापूरसह मुंबई, गडहिंग्लज, सातारा, इचलकरंजी, नांदणी, म्हसवड, पेठवडगाव, मुरगूड, बीड, मराठवाडा, बार्शी आदी ठिकाणांहून कलाकारांची मांदियाळी होती. नयन सुख देणार्‍या एकाहून एक सरस कलाकृतींचा आविष्कार एकाच ठिकाणी पाहण्याचा योग यानिमित्त कला रसिकांना आला.

कार्यक्रमप्रसंगी अजेय दळवी, अमृत पाटील, विजय टिपुगडे, इंद्रजित नागेशकर, धनंजय जाधव, रियाज शेख, सर्जेराव निगवेकर, सागर कारंडे, किशोर पुरेकर, संजीव संकपाळ, अतुल डाके, उज्ज्वल दिवाण आदी मान्यवरांसह अर्चना आंबिलढोक, दुर्गा अजगावकर, दीपाली सप्रे यांच्यासह कलारसिकांची उपस्थिती होती. अडीच वर्षाच्या चिमुकलीसह नव्वदीचे आजोबा लक्षवेधी कोवळ्या उन्हात हातामध्ये ब्रश घेऊन कॅनव्हासवर रंगरेषा साकारणारे चिमुकले व नव्वदीचे आजोबा महोत्सवात लक्षवेधी ठरले. अडीच वर्षाच्या बालिकेसह मंदार लोहारने साकारलेल्या शिल्पकलेचे कलारसिकांनी कौतुक केले. थरथरत्या हातामध्ये स्थिरता साधत प्रात्यक्षिक चित्रे साकारून कलारसिकांना आनंद देणार्‍या आजोबांनी मने जिंकली.