Mon, Aug 19, 2019 11:06होमपेज › Kolhapur › रेल्वे स्थानकाचे रूप पालटले

रेल्वे स्थानकाचे रूप पालटले

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 1:35AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर रेल्वे स्थानक आणि संपूर्ण परिसर चकाचक झाला. गेल्या काही दिवसांत सुरू असलेल्या विविध कामांमुळे रेल्वे स्थानकाचे रूपच पालटले आहे. मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक शनिवारी (दि.13) रेल्वे स्थानकाची पाहणी करणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर स्थानकावर सध्या लगीनघाईच सुरू आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानकाची तपासणी होणार आहे. यानिमित्त सुरू असलेल्या कामांमुळे रेल्वे स्थानक ‘चकाचक’ झाले आहे. स्थानकावरील तीनही प्लॅटफार्मची स्वच्छता आणि सजावट करण्यात आली आहे. संपूर्ण स्थानकावरील शेडची दुरुस्ती करण्यात आली आहे. तर स्थानकाला रंगरंगोटीही करण्यात आली आहे. स्थानकाच्या इमारतीच्या मुख्य पोर्चचे सिलिंग नव्याने करण्यात आले असून व्हीआयपी रूमही नव्याने सजवण्यात आली आहे.

प्रवासी कक्षासह तिकीट बुकिंग, आरक्षण कक्षाचीही दुरुस्ती करण्यात आली आहे. याठिकाणी आकर्षक नक्षीकामही करण्यात आले आहे. प्लॅटफार्म क्रमांक एक शेजारील रिकाम्या जागेत बगीचा विकसित करण्यात आला आहे. यासह याच प्लॅटफार्म क्रमांक एकच्या बाजूचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. रेल्वे स्थानक परिसरात डांबरीकरण करण्यात आले असून, वाहनांच्या पार्किंगसह दिशादर्शक पट्टेही मारण्यात आले आहेत. स्थानकावर नव्याने इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड बसविण्यात आला आहे. यासह बोगीची (डब्याची) स्थिती दर्शवणारेही इलेक्ट्रॉनिक बोर्ड नव्याने बसवण्यात आले आहेत. स्थानकावर सुरू असलेल्या कामांमुळे स्थानक अक्षरश: उजळून निघाले असून सुरू असलेल्या कामांवर स्थानिक अधिकार्‍यांसह रेल्वेच्या पुणे विभागातील वरिष्ठ अधिकारीही देखरेख करत आहेत. काही दिवसांपासून अधिकार्‍यांनी स्थानकावर तळच ठोकला आहे.