कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर - पुणे मार्गाचे विद्युतीकरणाचे आणि पुणे-मिरज-लोंढा मार्गाचे दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. ही कामे वेगाने करण्यात येत असल्याने ती मुदतीपूर्वीच पूर्ण होतील, असा विश्वास मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी बुधवारी व्यक्त केला. त्यांनी कोल्हापूर रेल्वे स्थानकाची बुधवारी पाहणी केली. कोल्हापूर - वैभववाडी मार्गाबाबत ‘अच्छी खबर’ मिळेल असे सांगत शर्मा यांनी याबाबत अधिक भाष्य करण्याचे टाळले.
शर्मा म्हणाले, कोल्हापूर-पुणे विद्युतीकरणाचे काम पॉवर ग्रीड कार्पोरेशनकडे देण्यात आले आहे. पुणे-मिरज-लोंढा या मार्गाचे दुहेरीकरण करण्यात येत आहे, त्यापैकी पुणे - सातारा हे दुहेरीकरणाचे काम सुरू झाले आहे. पाच वर्षांची मुदत असली तरी त्यापेक्षा कमी वेळात हे काम पूर्ण होईल. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने कोल्हापूरचे महत्त्व आहे. मात्र, स्थानकावरील प्लॅटफॉर्मचा विस्तार झाल्यानंतरच नवीन गाड्या सुरू करण्याचा विचार करता येईल, असेही त्यांनी सांगितले.
विविध मागण्या येत आहेत, त्याबाबत विचारही केला जात आहे. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याचाच प्रयत्न आहे. गाड्याच्या वेळापत्रकात बदल करण्याचाही विचार आहे. मात्र, सर्व स्थानकांची तपासणी झाल्यानंतर त्याचा अहवाल सादर केला जाईल. हा अहवाल आल्यानंतरच याबाबतचे निर्णय होतील, असेही शर्मा यांनी सांगितले. सकाळी 9 वाजता त्यांचे आगमन झाले.
सुमारे तासभर त्यांनी स्थानकावरील विविध विभागांना भेटी देऊन पाहणी केली. विविध संस्था, संघटनांच्या वतीने मागण्यांची निवेदने देण्यात आली. प्रवासी संघटनांच्या वतीने त्यांचे कोल्हापूर फेटा बांधून, औक्षण करून स्वागत करण्यात आले. यानंतर रेल्वे स्थानकावर नूतनीकरण करण्यात आलेल्या ‘व्हीआयपी’ कक्षाचे उद्घाटन भगिरथी महिला मंचच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांच्या हस्ते व शर्मा यांच्या उपस्थितीत झाले. स्थानकासाठी 250 कुंड्या देणार्या ‘कोल्हापूर ग्रीन’च्या सदस्यांचे शर्मा यांनी कौतुक केले. स्थानक स्वच्छ आणि ग्रीन राहण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे सौ. महाडिक यांनी सांगितले.स्थानकावरील रोपटी, झाडे यांचे संगोपनाची जबाबदारी स्वीकारल्याचे अंतनार्द फौंडेशनच्या वतीने सांगण्यात आले. स्थानकावरील भिंतीवर कोल्हापूरचा वारसा आणि परंपरेचे दर्शन घडवणारी चित्रे रेखाटणार्या कलाकर, स्थानक अधीक्षक यांच्यासह रेल्वेतील अधिकारी, कर्मचार्यांचा रोख रक्कम देऊन शर्मा यांनी सत्कार केला. सकाळी सव्वा दहा वाजता ते मिरजेला रवाना झाले.
यावेळी मध्य रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक शैलेंद्र सिंग, पुणे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णात पाटील, विभागीय वाहतूक व्यवस्थापक गौरव झा, मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल उदासी, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य समीर शेठ, शिवनाथ बियाणी, मोहन शेटे आदींसह रेल्वेचे मुंबई, पुणे व कोल्हापूर येथील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
एसी डब्यात आढळला उंदीर
नागपूर-कोल्हापूर गाडीच्या एसी डब्यात उंदीर आढळल्याची तक्रार तीन दिवसांपूर्वी थेट शर्मा यांच्याकडेच आली होती. त्याचा संदर्भ देत तपासणीदरम्यान संबधित अधिकार्यांना शर्मा यांनी सुनावले. यापुढे असा प्रकार घडला तर थेट कारवाई केली जाईल असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.