Tue, Jul 23, 2019 06:53होमपेज › Kolhapur › कोल्हापूर-पुणे पॅसेंजर प्रवास दोन तासांनी होणार कमी

कोल्हापूर-पुणे पॅसेंजर प्रवास दोन तासांनी होणार कमी

Published On: Feb 27 2018 2:04AM | Last Updated: Feb 27 2018 1:17AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर-पुणे या रेल्वे पॅसेंजरचा प्रवास दोन तासांनी कमी करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या मार्गावर प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या मागणीनुसार या गाडीचा वेग वाढवण्यात येणार आहे. येत्या एक मार्चपासून हा नवा बदल अंमलात आणला जाणार आहे. महिन्याभरासाठी हा प्रयोग केला जाणार असला, तरी नंतर तो कायम होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर-पुणे मार्गावर पहाटे पावणेपाच वाजता (4.45 वा.) सुटणारी पॅसेंजर पुण्यात दुपारी सव्वाचार वाजता पोहोचते. कोल्हापूर-पुणे या मार्गासाठी या गाडीला सुमारे साडेअकरा तास लागतात. यामुळे या गाडीचा वेग वाढवावा, अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने होत होती. या मागणीचा विचार करून या गाडीचा वेग वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. वेग वाढवून या गाडीचा प्रवासाचा कालावधी दोन तासांनी कमी करण्यात येणार आहे. पहाटे पावणेपाच वाजता सुटून दुपारी सव्वाचारला पोहोचणारी ही गाडी आता दुपारी दोन वाजून 40 मिनिटांनी पोहोचणार आहे.

या गाडीचा वेग वाढवला असला, तरी कोल्हापूर-पुणे या मार्गावर थेट प्रवास करणार्‍यांसाठी ही गाडी तशी फायदेशीर नाही. सकाळी आठ वाजता सुटणारी कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस याच वेळेदरम्यान पुण्यात पोहोचत असल्याने पहाटे सुटणार्‍या पॅसेंजरला थेट प्रवाशांची संख्या अत्यल्प राहण्याची शक्यता आहे. या गाडीचा वेग आणखी वाढवून ही गाडी दुपारी 12 पर्यंत पुण्यात पोहोचावी, त्याद‍ृष्टीने वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.